शाहरुखपाठोपाठ सलमान खाननेही ‘टायगर ३’मधून जबरदस्त कमबॅक केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘टायगर ३’ने जगभरात आत्तापर्यंत ४५० कोटींची कमाई केली आहे. याआधी सलमानचे ‘अंतिम’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते ज्याला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दोन्ही चित्रपट सपशेल आपटले. नुकतंच ‘टायगर ३’च्या सेलिब्रेशनवेळी सलमानने मीडियाशी संवाद साधला.
यावेळी सलमानने प्रथमच त्याच्या या दोन्ही फ्लॉप चित्रपटांबद्दल भाष्य केलं. ‘अंतिम’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप होण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत आणि यातूनच आपल्याला शिकायला मिळालं असं सलमानने स्पष्ट केलं आहे. चित्रपटांच्या तिकीटांचे दर कमी असल्याने या चित्रपटातून नुकसान झाल्याचं सलमानने मीडियाशी बोलताना सांगितलं.
आणखी वाचा : ‘A’ सर्टिफिकेट देऊनसुद्धा रणबीरच्या ‘अॅनिमल’वर चालली सेन्सॉरची कात्री; सुचवले ‘हे’ पाच बदल
सलमान म्हणाला, “ते चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा लोक फारसे चित्रपटगृहात जात नव्हते. त्यावेळी त्या चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी होतं कारण तेव्हा आम्ही तिकीटांचे दर कमी ठेवलेले जेणेकरून प्रेक्षकांचे पैसे वाचतील. तुम्ही ‘टायगर ३’ ६०० रुपये ते १००० रुपये देऊन पाहिलात, पण ‘अंतिम’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ च्या वेळी तिकीटांचे दर २५० रुपयांपेक्षा जास्त नव्हते. ‘किसी का भाई किसी की जान’ आज प्रदर्शित झाला असता तर कमाईचे आकडे फार वेगळे असते.”
याबरोबरच आपल्या अपयशातून बरंच काही शिकायला मिळालं असंही सलमान म्हणाला. ‘टायगर ३’ला ‘जवान’ किंवा ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडता आला नसला तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘टायगर ३’ मध्ये सलमानसह कतरिना कैफ व इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटानंतर सलमान आता करण जोहरबरोबरच्या आगामी ‘बुल’ या चित्रपटात झळकणार आहे.