बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ‘टायगर ३’मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचाही अॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. आता चित्रपटाचा पहिला शो आणि अॅडव्हान्स बुकिंगबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
यश राज फिल्म्सनी आजपासून म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून ‘टायगर ३’चे अॅडव्हान्स बुकिंग ओपन केले आहे. मुंबईच्या आयमॅक्स थिएटरमध्ये सकाळी ६.०५ चा शोसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याच्या काही क्षणातच या चित्रपटाने १ कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार ९० लाखांची तिकीटे २डीसाठी तर उर्वरित तिकिटे ही आयमॅक्स ४डीसाठी विकली गेली आहेत.
आणखी वाचा : Indian 2 Intro: २६ वर्षांनी पुन्हा भ्रष्टाचाराशी दोन हात करणार कमल हासन; बहुचर्चित ‘इंडियन २’चा टीझर समोर
नुकताच या चित्रपटाचा एक नवा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘टायगर ३’चे अॅडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाले आहे. UK, UAE व USA मध्ये ‘टायगर ३’च्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निर्माते ११ नोव्हेंबरला यूएसए आणि कॅनडामध्ये ‘टायगर ३’ प्रदर्शित करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
‘टायगर ३’ हा ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबर इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार असून, तो हिंदीबरोबर तमीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.