बॉलीवूडमधील काही बड्या कलाकारांच्या यादीत हमखास येणारं एक लोकप्रिय नाव म्हणजे सलमान खान (Salman Khan). सलमाननं आतापर्यंत अनेक गोष्टींनी आपल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सलमान खान अभिनयाशिवाय खासगी आयुष्यात अनेक गोष्टी करत असतो, ज्याच्या चर्चा कायमच होताना दिसतात. आपल्या अभिनयासाठी ओळखला जाणारा सलमान त्याच्या दयाळू स्वभावासाठीही तितकाच ओळखला जातो. याची अनेक उदाहरणं आहेत. अशातच मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या मुलानं त्याचं कौतुक केलं आहे.
बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा म्हणजेच मिमोह चक्रवर्तीनं (Mimoh Chakraborty) आजवरच्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे. तो त्याच्या वडिलांइतका प्रसिद्ध वा लोकप्रिय नाही; पण त्याचा या इंडस्ट्रीतील संघर्ष अजूनही सुरूच आहे. अशातच एका मुलाखतीत मिमोहनx संघर्ष काळात त्याला सलमानं केलेल्या मदतीबद्दल सांगितलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत, अभिनेत्यानं सलमान खानबरोबरच्या नात्याबद्दल आणि सुरुवातीच्या काळात सलमाननं त्याला कसा पाठिंबा दिला याबद्दल सांगितलं.
‘डिजिटल कमेंटरी’शी झालेल्या संभाषणात मिमोहनं त्याच्या ‘जिमी’ या पहिल्या चित्रपटाबद्दल सांगितले. याबद्दल मिमोहनं म्हटलं, “सलमान भाईंनी मला खूप मदत केली आहे. तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे. तो माझ्या वडिलांवर खूप प्रेम करतो. तेव्हा सलमानभाईंनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की, ते माझ्या ‘पार्टनर’ चित्रपटाबरोबर माझ्या पहिल्या चित्रपट ‘जिमी’चा टीझर दाखवू इच्छितात.”
पुढे मिमोहनं सांगितलं, “तेव्हा माझं सगळं कुटुंब ‘पार्टनर’ चित्रपट बघण्यासाठी गेलं होतं. तेव्हा माझ्या चित्रपटाचा टीझर आला आणि लोक गप्प झाले. पण, पाच सेकंदांनी त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मी त्यावेळी २४ वर्षांचा होतो, मला वाटलं मी आता मोठा स्टारच झालो आहे. माझा डान्स पाहून लोक शिट्या वाजवून नाचू लागले आणि हे सगळं बघून मला खूप बरं वाटलं होतं.”
पुढे मिमोहनं सांगितलं, “पण शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला आणि अचानक फोन वाजणं बंद झाले. माझे चित्रपटाचे चेक बाउन्स झाले आणि हे सर्व अचानक घडलं. त्यावेळी माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं होतं. मला वाटलं माझं आयुष्य संपलं. मी एक वर्ष घराबाहेर पडलो नाही. या काळात तो ऑडिशनसाठी अनेक कास्टिंग डायरेक्टरकडे जात असे; पण मला सर्वत्र नकार मिळत होता.”
पुढे मिमोहनं सलमानविषयी असं म्हटलं, “सलमान खान त्याच्या ‘सुलतान’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. तेव्हा त्यानं माझ्या आईला फोन केला आणि सांगितलं की, तू मिमोहला चित्रपटाच्या सेटवर पाठव आणि मी लगेच गेलो. नंतर सलमाननं माझ्याकडे बोट दाखवीत सेटवरील एका सहायक दिग्दर्शकाला सांगितलं की, तुम्हाला हे काम करण्यात अडचण येत आहे. पण हे पाहा, या लोकांना संघर्ष करण्याची संधीही मिळत नाहीये.”
यापुढे मिमोह म्हणाला, “मला अजूनही त्याचे (सलमानचे) शब्द आठवतात. सलमानभाईनं मला सांगितले की, मिमोह तू कठोर परिश्रम करीत राहा आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. तुला नक्कीच संधी मिळेल. अभिषेक बच्चननंही हेच म्हटले होतं की कोणाचंही ऐकू नका, तू कोण आहेस हे लक्षात ठेव आणि प्रयत्न करीत राहा.” दरम्यान, मिमोहनें दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’मध्ये काम केलं आहे.