Tere Naam Actress Bhumika Chawla : सतीश कौशिक दिग्दर्शित आणि जैनेंद्र जैन लिखित ‘तेरे नाम’ चित्रपट २००३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री भूमिका चावला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील अनेक गाणी आजही सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. इतकंच काय तर, सलमानच्या केसांची या चित्रपटात विशिष्ट हेअरस्टाइल होती. ‘तेरे नाम’ प्रदर्शित झाल्यावर भाईजानच्या अनेक चाहत्यांनी अगदी तशीच हेअरस्टाइल करायला सुरुवात केली आणि कालांतराने सर्वत्र या लूकला ‘तेरे नाम’ हेअरस्टाइल म्हणून ओळख मिळाली.
‘तेरे नाम’मध्ये सलमान खानने ‘राधे’ ही भूमिका साकारली होती. स्वभावाने अतिशय हिंसक, बिघडलेला, बेरोजगार मुलगा ‘राधे मोहन’ अशी ही व्यक्तिरेखा होती. हा राधे, निर्जरा भारद्वाजच्या ( Bhumika Chawla ) प्रेमात पडतो. तिचे वडील मंदिरात पुजारी असतात. निर्जरा अतिशय साधीभोळी असते. याच साध्याभोळ्या आणि प्रामाणिक अशा निर्जराची भूमिका चित्रपटात भूमिका चावलाने साकारली आहे. ‘तेरे नाम’ हा तिचा बॉलीवूडमधला पहिलाच सिनेमा होता आणि याच चित्रपटामुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.
भूमिकाच्या साध्याभोळ्या लूकने वेधलं लक्ष
भूमिकाने ( Bhumika Chawla ) तिच्या निरागसपणाने आणि आपल्या दमदार अभिनयाने अनेक लोकांची मनं जिंकून घेतली. भूमिका यानंतर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये झळकली पण, तिने साकारलेली निर्जरा आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. सध्या लाइमलाइटपासून दूर असलेली ही अभिनेत्री २१ वर्षांनंतर कशी दिसते याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली होती. अखेर नुकतीच भूमिका आपल्या पतीसह एअरपोर्टवर दिसली. यावेळी पापाराझींना या अभिनेत्रीने तेवढ्याच निरागसतेने अभिवादन केलं.
भूमिकाचं वैयक्तिक आयुष्य
भूमिका चावलाने २००७ मध्ये भरत ठाकूर यांच्याशी लग्न केलं. भूमिकाचे पती भरत ठाकूर हे योग शिक्षक आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांना नावाजलं जातं. त्यांनी अनेक ध्यान कार्यशाळा, योग सत्रे आणि कॉर्पोरेट योग कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. अलीकडच्या काळातील अभिनेत्री एअरपोर्ट लूकवर प्रचंड मेहनत घेताना दिसतात पण, भूमिका मात्र एकदम आरामदायी कपड्यांमध्ये दिसली.
ब्लँक प्रिंटेड टी-शर्ट, काळी ट्रॅक पँट आणि जॅकेट असा लूक तिने केला होता. तिच्या ‘नो मेकअप’ लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वयाच्या ४६ वर्षी सुद्धा भूमिका तेवढीच फिट आणि सुंदर दिसते.