Tiger 3 Worldwide Collection: सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या स्पाय चित्रपटासाठी प्रेक्षक किती गर्दी करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या दिवसाची आकडेवारी बघता अखेर सलमानचा चित्रपट बघायला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक थिएटर्समध्ये गेले आहेत, असंच म्हणावं लागेल. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार टायगर ३ ने पहिल्या दिवशी ४० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने तब्बल ४४.५० कोटी कमावले आहेत. नुकतंच ‘टायगर ३’ने एक नवा रेकॉर्ड रचल्याचं स्पष्ट झालं आहे. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘टायगर ३’ हा दिवाळीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण’मध्ये अमीषा पटेलबद्दल विचारल्यावर ‘अशी’ होती करीना कपूरची प्रतिक्रिया; अभिनेत्री म्हणाली…

नुकतंच ‘यश राज फिल्म्स’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून याबद्दल ट्वीट केलं आहे. दिवाळीच्या दिवशी एक नवा इतिहास रचण्यात आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘टायगर ३’चे पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. या चित्रपटाने जगभरात तब्बल ९४ कोटींची कमाई केली आहे. यापैकी भारतातील एकूण कमाई ही ५२.५० कोटी असून बाहेरील देशांमध्ये या चित्रपटाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४१.५० कोटींची कमाई केली आहे.

काही प्रमाणात चित्रपटावर आणि त्याच्या कथेवर टीका होत असली तरी बॉक्स ऑफिसवर पुन्हा सलमान खानने इतिहास रचला आहे. रविवार आणि त्यातूनही दिवाळी असतानाही रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई या चित्रपटाने केली आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमानसह कतरिना कैफ, इम्रान हाशमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तसेच चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचीही जबरदस्त चर्चा आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीनही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan tiger 3 collects 94 crores worldwide at box office on diwali day avn