बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमी चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. सलमान खानबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. लवकरच सलमान खान हॉटेल व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोड येथील जागेवर हॉटेल बांधण्याचे नियोजन करीत आहे. ही जागा समुद्रकिनाऱ्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचे कुटुंब कार्टर रोड, वांद्रे येथील सी-फेसिंग प्लॉटवर हॉटेल बांधण्याचा विचार करीत आहे. बीएमसीने इमारतीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे १९ मजली हॉटेल असणार आहे. या जागेवर पूर्वी स्टारलेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी होती. या जागेवर खान कुटुंबाचे अपार्टमेंट होते. सुरुवातीला या जागेवर गृहनिर्माण संस्था बांधण्याचे नियोजन होते, मात्र नंतर त्यात बदल करण्यात आला.

सलमान खानच्या या १९ मजली हॉटेलची उंची ६९.९ मीटर असेल. बीएमसीकडे सादर केलेल्या प्रस्तावात या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट असणार आहे. जिम आणि स्विमिंग पूल तिसऱ्या मजल्यावर, तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअर असणार आहे. इमारतीचा पाचवा आणि सहावा मजला कन्व्हेन्शन सेंटर म्हणून वापरला जाणार आहे. इमारतीच्या आराखड्यात हॉटेल रूमसाठी ७ ते १९ मजले ठेवण्यात आले आहेत.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सलमानचा नुकताच ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई करू शकला नाही. सलमान खानचा ‘टायगर-३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानबरोबर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी दिसणार आहेत.