सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. आरोपींनी लगेच घटनास्थळावरून पळ काढला होता. परंतु, यानंतर पुढच्या ४८ तासांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विकी गुप्ता आणि सागर पाल अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलमान खानचा जबाब नोंदवला आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने नेमलेल्या आरोपींनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. बुधवारी ( १२ जून ) एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह चार सदस्यांची टीम ४ जून रोजी सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज यांचे जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्याच्या घरी पोहोचली होती. यावेळी दोन्ही भावांची एकूण सहा तास चौकशी करण्यात आली.

हेही वाचा : “असला घाणेरडा परिसर”, रस्त्यावरचा कचरा पाहून शशांक केतकर संतापला; म्हणाला, “मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा…”

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, घटनेच्या दिवशी तो घरीच होता आणि पार्टीनंतर रात्री तो उशिरा झोपला. गाढ झोपेत असताना फ्लॅटच्या बाल्कनीत गोळी लागल्याच्या आवाजाने त्याला जाग आली. मोठा आवाज आल्यावर घराच्या बाल्कनीत जाऊन पाहिल्यावर त्याला कोणीही दिसलं नाही. यानंतर पोलिसांनी सलमान खानचा भाऊ अरबाजचाही जबाब नोंदवला, जो गोळीबाराची घटना घडल्यानंतर त्याच्या जुहू येथील निवासस्थानी होता. परंतु, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमानला दिलेल्या पूर्वीच्या धमक्यांबाबत अरबाजला माहिती होती. सलमानची तीन तास तर अरबाजची दोन तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. दोन्ही भावांना एकूण दीडशेहून अधिक प्रश्न विचारण्यात आले.

गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमानचे वडील सलीम खान देखील घरी उपस्थित होते. मात्र, वयोमानामुळे त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. आवश्यकता भासल्यास गुन्हे शाखेकडून त्यांचीही विचारपूस केली जाईल असं सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या गावी पोहोचली पूजा सावंत, दिसली निसर्गरम्य वातावरणाची झलक

दरम्यान, १४ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथे सलमान खानच्या घराबाहेर दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर, पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली होती, तर अनुज थापन आणि अन्य एका व्यक्तीला २६ एप्रिल रोजी पंजाबमध्ये ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नंतर पोलीस कोठडीत अनुज थापनचा मृत्यू झाला.