“प्रेम आंधळं असतं” असं आपण नेहमीच म्हणतो. अशाच एका सेलिब्रिटीच्या प्रेमकहाणीमधला एक किस्सा आज जाणून घेऊया. ‘सलमान खान – ऐश्वर्या राय’ ही ९० च्या दशकातील सर्वात गाजलेली जोडी होती. या दोघांनी खरं तर ‘हम दिल दे चुके सनम’मध्येच एकत्र काम केलं, पण तरीही त्यांच्या प्रेमकहाणीची चर्चा आजही होते. सलमान तेव्हा ऐश्वर्याच्या प्रेमात एवढा आकंठ बुडाला होता की त्याने इतर कोणा अभिनेत्यासोबत काम करण्यावरून ऐश्वर्याला बऱ्याचदा खडसावलं होतं.

नंतर ऐश्वर्याच्या घराखाली दारू पिऊन केलेला तमाशाबद्दल साऱ्या जगाला ठाऊक आहे. त्यानंतर मात्र ऐश्वर्या सलमान पासून फारकत घेऊ लागली आणि हळूहळू त्यांचं नातंही संपुष्टात आलं. त्या दोघांचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट नसून या दोघांच्या खऱ्या प्रेमकहाणीचा प्रवास होता असं आजही कित्येकांना वाटतं.

आणखी वाचा : जान्हवी कपूरने मल्टिप्लेक्समध्ये विकले पॉपकॉर्न; कारण…

या चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याचं पात्र म्हणजेच नंदिनी तिचा प्रियकर समीरलं सोडून तिचा पती वनराजकडे परत येते. हा क्लायमॅक्स खरंतर सलमानला चांगलाच खटकला होता. ऐश्वर्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सलमानला नंदिनीने शेवटी समीरची निवड करावी अशी इच्छा होती. सलमानने हा क्लायमॅक्स बदलण्यासाठी बरेच प्रयत्न केले असं म्हंटलं जातं. सलमानने खुद्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यात तो अपयशीच ठरला.

शेवटी चित्रपट हे एका दिग्दर्शकाचं स्वप्न असतं. संजय लीला भन्साळी यांनी त्यांना जे योग्य वाटत होतं तेच केलं आणि नंदिनी वनराजकडे परत आली. सलमानला हा शेवट चांगलाच खटकला, शेवटच्या ओपेरा हाऊसमधल्या सीनमध्ये त्याला नंदिनीत ऐश्वर्याच दिसत होती. यामुळे नंतर त्याने कित्येक वर्षं संजय लीला भन्साळी यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. भन्साळी यांनी याबद्दल कुठेच वाच्यता केली नाही, पण सलमानने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “एखाद्या व्यक्तीने ज्याच्यावर पहिलं प्रेम केलं त्यालाच ते मिळायला हवं, कर्तव्यापेक्षा प्रेम श्रेष्ठ याअर्थाने नंदिनीने समीरची निवड करणंच गरजेचं होतं.” ऐश्वर्याला तिच्या खऱ्या आयुष्यातील ‘वनराज’ अभिषेक बच्चनच्या रूपात गवसला खरा, पण सलमान मात्र अजूनही त्याच्या ‘नंदिनी’साठी तिथेच थांबला आहे.

Story img Loader