बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी जान’ या चित्रपटात व्यस्त आहे. नुकतंच त्याने यातील नवीन गाण्याचा एक प्रोमो शेअर केला आहे. पण तुम्हाला माहितीये का कि १९९३ मध्ये आलेल्या ‘बाजीगर’साठी सलमानला विचारण्यात आलं होतं. मध्यंतरी सलमानने याबद्दल खुलासा केलेला. सलमानला यात काही बदल हवे होते आणि यामुळेच त्याने चित्रपट करण्यास साफ नकार दिला होता. अभिनेत्याने नकार दिल्यानंतर या चित्रपटात विकी मल्होत्राची भूमिका शाहरुख खानने साकारली आणि इतिहास रचला.
या चित्रपटाने शाहरुखच्या करिअरला एक वेगळीच दिशा मिळाली. या चित्रपटाबाबत सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी एक सल्ला दिला होता. ‘बाजीगर’मधील व्यक्तिरेखा निगेटिव्ह होती, त्यामुळे त्यात काही महत्त्वाचा बदल त्यांनी अब्बास मस्तान यांना सुचवला होता, पण ते मात्र हा बदल करण्यास तयार नव्हते. सलीम खान यांच्या म्हणण्यानुसार या कथानकात तेव्हा एका आईची भूमिका हवी होती आणि सलमानने हे अब्बास मस्तान यांना सांगितलं होतं, पण नंतर सलमाननेच या चित्रपटाला नकार दिला.
आणखी वाचा : ‘सेल्फी’ ठरला अक्षय कुमारच्या कारकीर्दीतील सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट; विकेंडला कमावले ‘इतके’ कोटी
सलमानने ‘द कपिल शर्मा शो’च्या मंचावर याबद्दल खुलासा केला होता. तो म्हणाला होता, “मला बाजीगरची कथा आवडली होती, त्यात फक्त मी आणि माझ्या वडिलांनी आईचे पात्र घ्यायचा सल्ला दिला होता, अब्बास मस्तान यांना प्रथम ही गोष्ट खटकली त्यानंतर आम्ही पण त्या चित्रपटाचा नाद सोडला, शाहरुख खानने तो चित्रपट केला आणि नंतर आम्हाला अब्बास मस्तान यांचा नंतर फोन आला तेव्हा ते म्हणाले की तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद आम्ही त्याप्रमाणे कथानकात बदल केले आहेत.”
शाहरुखने ‘बाजीगर’ चित्रपटात विकी मल्होत्राची भूमिका साकारली होती. चित्रपटातील व्यक्तिरेखा असूनही या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं. या चित्रपटात त्याच्याशिवाय बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि काजोल देखील मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. ९० च्या दशकात शाहरुख ‘डर’ आणि ‘अंजाम’ तसेच ‘बाजीगर’ सारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला होता. नुकतंच सलमान आणि शाहरुख यांना ‘पठाण’मध्ये एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना खूप वर्षांनी मिळाली.