सलीम खान(Salim Khan) हे त्यांच्या बॉलीवूडमधील योगदानासाठी ओळखले जातात. सलीम खान व जावेद अख्तर ही लेखक जोडी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय होती. त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. याबरोबरच सलीम खान हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचा मुलगा सलमान खान बॉलीवूडमधील मोठा स्टार आहे. मात्र, अनेकदा सलीम खान व सलमान खान यांच्यातील नाते चर्चेचा विषय ठरताना दिसते. आता मात्र, अभिनेता आदि इरानीने सेटवर सलमान खानचे वागणे हे बालिश असायचे, तसेच त्याचे वडील त्याच्याशी कसे वागायचे, याबद्दल खुलासा केला आहे.
तो उद्धट नव्हता, पण…
आदि इरानीने सलमान खानच्या चोरी चोरी छुपके छुपके या चित्रपटात काम केले आहे. त्यावेळी अभिनेत्याचे सेटवर वागणे कसे होते, यावर फिल्मीतंत्रा मीडियाशी बोलताना अभिनेत्याने म्हटले, “त्याचा जो अॅटिट्यूड होता किंवा जे राऊडी वागणे होते, ते लोकांसाठी होते, त्याला फक्त त्याच्या मर्जीने त्याला हवे तसे जगायचे होते. जर त्याला कोणती गोष्ट करायची नसेल, तर तो करत नसे. तो उद्धट नव्हता, पण तो बालिश होता. मला असे वाटते की, तो त्या बालिशपणामध्ये जे काही करायचा त्याला उद्धट म्हटले जायचे. जे चुकीचे होते, ते चुकीचेच होते, पण तो मुद्दाम गोष्टी करायचा असे नव्हते.”
पुढे आदि इराणी म्हणाला, “सलमान खान सिनेमांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येत होता. त्याचे वडील सलीम खान होते. ते उत्तम आहेत. सलमान खानसुद्धा चांगला व्यक्ती आहे. सलमान खानने स्वत:वर खूप काम केले आहे. त्याला माहीत होते की तो चांगला अभिनेता आहे, पण तो उत्तम अभिनेता नाही. तो शाहरूख इतका चांगला अभिनेता होऊ शकत नाही, हे त्याला माहीत होते, त्यामुळे त्याने स्वत:ची वेगळी छाप उमटवली. “
पुढे सलीम खान-सलमान खान यांच्याविषयी बोलताना अभिनेत्याने म्हटले, “जेव्हा सलमान खान सिनेमात नव्हता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. माझी एक्स-गर्लफ्रेंड त्याची चांगली मैत्रीण होती, तर ती मला त्याच्या घरी घेऊन जायची. मी त्याला भेटायचो, जेवायचो. सलीम खान सलमान खानबरोबर जसे वागायचे, ते पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटायचे की कोणते वडील स्वत:च्या मुलाबरोबर असे वागू शकतात? सलमान खानला व्यायाम करणे आवडायचे. जेव्हा तो व्यायाम करत असे तेव्हा सलीम खान त्याला म्हणत असत, याला अभिनेता व्हायचे आहे, याला वाटते की व्यायाम केल्याने अभिनेता होता येते. अभिनयासाठी खूप काही करावं लागतं. सलमान खानला त्याला वडिलांच्या वागण्याचा राग यायचा. तो म्हणायचा की माझे वडील मला मदत करण्याऐवजी माझ्याशी असे का वागतात? माझी गर्लफ्रेंड म्हणायची, सलीम खान मुद्दाम असे वागतात. सलमानने जिद्दीला पेटून वडिलांसमोर स्वत:ला सिद्ध करावे, यासाठी ते असे वागतात.”