आपण खूप अपेक्षेने एखादी कलाकृती पाहण्यासाठी जावं आणि आपला भ्रमनिरास व्हावा तशीच भावना ‘सॅम बहादूर’ सिनेमा पाहून आली. सॅम माणेकशॉ यांची कारकीर्द दैदिप्यमान होती यात काही शंकाच नाही. मात्र सिनेमात ते सगळं उतरवत असताना पटकथेचा, दिग्दर्शनाचा, पात्र निवडीचा सगळ्याचाच अंदाज चुकला आहे. विकी कौशलने सॅम बहादुर यांची लकब पकडण्यासाठी, त्यांच्यासारखं दिसण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. मात्र बाकी सगळा आनंदी आनंद आहे.
सिनेमा एकसंध नाही
सिनेमाची सुरुवात सॅम माणेकशॉ यांच्या जन्माच्या प्रसंगाने होते. बाळाचं नाव काय ठेवायचं ? यावर सॅम माणेकशाँचे आई-वडील एका घटनेची चर्चा करताना दिसतात आणि आपल्या बाळाचं नाव बदलू असं म्हणतात. त्यानंतर थेट सॅम माणेकशाँची एंट्री होती. विकी कौशलला थोडसं ब्लर दाखवणं आणि मग सॅम बहादूर हे नाव येताच त्याचा चेहरा एकदम क्लिअर होणं हा प्रयोग चांगला जमला आहे. पुढचा सिनेमा म्हणजे एका मागोमाग एक येणाऱ्या प्रसंगांची मालिका आहे. त्यात सलगपणा नाही. पहिल्या प्रसंगात सॅम माणेकशॉ एका गोरखा रेजिमेंटच्या एका जवानाला नाव विचारतात तो उत्तर देतो सॅम बहादूर.. त्यावर सॅम माणेशाँचं स्मित हास्य.. कट टू या प्रसंगाचं वर्तुळ पूर्ण होतं. मात्र तोपर्यंत आपण एकामागोमाग एक घटना पाहात राहतो. त्यात कुठेच जोड वाटत नाही. हा प्रसंग झाला आता पुढचा प्रसंग.
यासाठी मधे मधे १९४२, १९४७, पंडित नेहरु वारले तो प्रसंग हे सगळं ओरिजनल फुटेज वापरुन सलगता देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र तो जमलेला नाही. ज्यांना सॅम माणिकशाँबाबत काही माहीत नाही अशा प्रेक्षकाच्या तर डोक्यावरुन हा सिनेमा जाईल यात काहीच शंका नाही. नीरज काबीला पंडित नेहरुंची भूमिका देण्यात आली आहे. नीरज काबी हा अत्यंत गुणी अभिनेता.. पण त्याला ही भूमिका अजिबात शोभलेली नाही. जी गोष्ट पंडित नेहरुंची तिच इंदिरा गांधींच्या भूमिकेची. इंदिरा गांधींच्या भूमिकेत फातिमा सना शेख आहे. मेक अप केला की आपण दिसतो इंदिरा गांधी असं तिला वाटलं असावं… कदाचित मेघना गुलजारलाही तसंच वाटलं असावं.. किंवा सॅम माणिकशाँना मोठं करता करता त्या भूमिकेवर काम करताना इतर पात्रं निवडण्यासाठी फार चोखंदळपणा दाखवला गेला नाहीये.
फातिमा सना शेखचा सुमार अभिनय
इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणं हे खरं तर खूप मोठं आव्हान आणि कलाकारासाठी मोठी संधी असते. सुचित्रा सेन यांची ‘आँधी’ सिनेमातली भूमिका ही इंदिरा गांधींवर बेतलेली होती. ती उंची अद्याप कुणालाही गाठता आलेली नाही. फातिमा सना शेखचंही तेच झालंय. फक्त बॉबकट केस आणि मध्ये पांढऱ्या केसांचा पॅच अशा प्रकारे इंदिरा गांधी होता येत नाही. त्यासाठी साजेसा अभिनयही करावा लागतो. सुप्रिया मतकरी यांनी ‘इंदिरा’ या नाटकातही इंदिरा गांधींची भूमिका केली आहे आणि मधुर भंडारकराच्या ‘इंदू सरकार’मध्येही त्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत होत्या. त्या शोभूनही दिसल्या. मात्र फातिमा सना शेखला ते जमलेलं नाही. इंदिरा गांधींच्या भूमिकेचं शिवधनुष्य फातिमा सना शेखला पेलता आलेलं नाही. ही भूमिका करताना हे शिवधनुष्य तिच्या अंगावर पडलं आहे जे प्रत्येक फ्रेममध्ये जाणवत राहतं.
फारसे दमदार संवादही नाहीत
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जीवन प्रवास सॅम बहादूर या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र यातल्या विकी कौशलचा अभिनय सोडला तर चित्रपट निराशाच करतो. निवडक अपवाद वगळता दमदार संवाद नसणं ही सिनेमाची आणखी एक उणी बाजू. सॅम माणेकशॉ हे त्यांच्या शौर्य गाथांसाठी आणि त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध होते. ‘स्विटी’ हा त्यांचा लाडका शब्द होता असं चित्रित करण्यात आलं आहे. कुणाशीही बोलताना ते हा शब्द वापरत असं दाखवण्यात आलं आहे. सिनेमा साकारताना सिनेमॅटिक लिबर्टीचा अतिरेक करत सॅम माणिकशॉ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनाही ‘स्विटी’ म्हणताना दाखवले आहेत. या दोघांमध्ये मैत्री होती असं सांगितलं जातं. असं असलं तरीही सॅम माणेकशॉ पंतप्रधान पदी असलेल्या इंदिरा गांधींना स्विटी म्हणतात हे ऐकतानाच खटकतं.
दिग्दर्शनाचा अभाव जाणवत राहतो
मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी सॅम माणेकशॉ हा विषय चांगला निवडला असला तरीही अडीच तास प्रेक्षकांना सिनेमा सहन करावा लागतो. याचं कारण पटकथेचा अभाव सिनेमात आहे, तसंच संपादनातल्या चुका जाणवत राहतात. चित्रपट मधेच संथ होतो, मधेच गती घेतो आणि २ तास ३० मिनिटांनी संपतो. विकी कौशलने खूप छान काम केलंय पण बाकी सिनेमा काही जमला नाही अशी प्रतिक्रिया देतच लोक बाहेर येतात.. त्यातच दिग्दर्शकाचं अपयश अधोरेखित होतं.
सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीच्या भूमिकेत सान्या मल्होत्रा आहे. तिच्या वाट्यालाही फार प्रसंग आलेले नाहीत. मात्र जिथे तिचे प्रसंग आहेत त्यात तिने फातिमा सना शेखच्या तुलनेत चांगलं काम केलं आहे.
सॅम माणेकशॉ यांच्या कारकिर्दीत वादही झाले होते. त्यातून ते सहीसलामत बाहेरही पडले. १९७१ च्या युद्धात त्यांची भूमिका महत्त्वाची असायची. ते भारताचे आठवे लष्कर प्रमुख होते. आव्हान स्वीकारलं की ते आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि ते आव्हान पूर्ण करायचं हा त्यांचा स्वभाव. तसंच आपल्या कामात त्यांनी कधीही राजकारण्यांना लुडबूड करु दिली नाही. तसेही प्रसंग सिनेमात दिसतात. मात्र एकसंध प्रसंगाची माळ दिग्दर्शकाला बांधता आलेली नाही. सॅम माणेकशॉ यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो आणि सिनेमा संपतो, ज्यानंतर प्रेक्षक हुश्श करुन चित्रपटगृहाबाहेर पडतात. त्यामुळे विकी कौशलचे फॅन असाल तर सिनेमा पाहाच पण फार अपेक्षा न ठेवता.