फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशल आणि चित्रपटाची निर्माती मेघना गुलजार इंडियन एक्सप्रेसचा खास कार्यक्रम ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. सॅम बहादुर नावाने ओळखल्या जाणाऱ्या सॅम माणेकशा यांचा भारतीय लष्करातील प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतरच्या भावना त्यांच्या मुलीने व्यक्त केल्या आहेत.
सॅम माणेकशा यांची मुलगी माया या मुलाखतीसाठी ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये उपस्थित होत्या. यावेळी माया यांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली. चित्रपटातील कोणता क्षण सर्वात जास्त मनाला स्पर्शून जाणारा ठरला, याबाबतही माया यांनी सांगितलं. हा चित्रपट संपूर्ण भारताला त्यांचा अभिमान वाटावा यासाठीच निर्मात्यांनी बनवला आहे, असं विधान माया यांनी कार्यक्रमात केलं. चित्रपटातील शेवटच्या सीनचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “मी चित्रपट दोनदा पाहिला आणि दोन्ही वेळा रडले. शेवटच्या दोन सेकंदात जेव्हा विकी प्रेक्षकांकडे पाहून हसतो ते पाहून मनात कालवाकालव होते.”
दरम्यान, ‘सॅम बहादुर’ चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही सॅम माणेकशा यांच्या पत्नीची भूमिका केली आहे. अभिनेत्री फातिमा सना शेख हिने या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. १ डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपटही रिलीज होणार आहे.