आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया संपूर्ण भारतभर दौरे करत आहे. ती नुकतीच मराठी बिग बॉसच्या मंचावर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यानंतर आलिया दक्षिण भारतात प्रमोशनसाठी गेली, जिथे हैदराबादमध्ये जिगराच्या प्री-रिलीज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंटसाठी समांथा रुथ प्रभूने विशेष उपस्थिती लावली आणि तिथे आलियाने समांथाचे मनापासून कौतुक केले, ज्यामुळे समांथा भावूक झाली.
आलिया आणि समांथाने एकत्र काम केले नसले तरी त्यांच्यातील भावनिक बंध या कार्यक्रमात दिसून आला. आलियाच्या कौतुकाने समांथाच्या डोळ्यात अश्रू आले. या कार्यक्रमाला समांथा रुथ प्रभू, दिग्दर्शक त्रिविक्रम आणि अभिनेता राणा दग्गुबती यांसारख्या बड्या कलाकारांची उपस्थिती होती, जे वसन बाला दिग्दर्शित ‘जिगरा’ ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी आले होते.
समांथा सगळ्यांसाठी आदर्श – आलिया भट्ट
आलियाने समांथाच्या प्रतिभेचे आणि खंबीरपणाचे कौतुक केले. ती म्हणाली, “सॅम, माझी प्रिय समांथा… तू पडद्यावर आणि पडद्याच्या मागे खऱ्या अर्थाने एक हिरो आहेस. तुझ्या प्रतिभा, खंबीरपणा आणि जिद्दीचा मला खूप आदर आहे.” आलियाने पुढे असेही सांगितले की, “पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून टिकून राहणे सोपे नाही. परंतु, तू त्या कल्पनांपलीकडे जाऊन तुझ्या प्रतिभेच्या जोरावर सर्वांसाठी आदर्श ठरली आहेस.” आलियाचे हे शब्द ऐकून समांथाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
दोन अभिनेत्रींमध्ये नेहमीच स्पर्धा नसते
आलियाने समांथाला या कार्यक्रमासाठी बोलावल्यावर समांथाने लगेच होकार दिला, असं आलियाने सांगितलं. आलियाने दिग्दर्शक त्रिविक्रमला, तिला आणि समांथाला घेऊन चित्रपट बनवण्याची विनंती केली. आलिया पुढे म्हणाली, “लोक म्हणतात की अभिनेत्री एकमेकींशी स्पर्धा करतात, पण तसं नेहमीच नसतं. आज इथे एक पॅन-इंडिया सुपरस्टार माझ्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी आली आहे, याबद्दल मी खूप आभारी आहे.”
करण जोहर’ जिगरा’ची निर्मिती आलिया भट्टने या सिनेमाची सहनिर्माती आहे. हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियाबरोबर वेदांग रैना प्रमुख भूमिकेत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd