दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा आज वाढदिवस आहे. ज्युनिअर एनटीआर, महेशबाबू, अल्लू अर्जुन व विजय या सुपरस्टार्सबरोबर स्क्रीन शेअर करत समांथाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘यशोदा’, ‘थेरी’, ‘माजिली’, ‘अ आ’, ‘अंजान’, ‘यु टर्न’, ‘पुष्पा’ अशा सुपरहिट चित्रपटांतून समांथाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
मनोरंजनविश्वातील करिअरप्रमाणेच समांथा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. समांथाने २०१७साली नागा चैतन्यबरोबर लग्नगाठ बांधली होती. नागा चैतन्यबरोबर विवाहबंधनात अडकण्यापूर्वी समांथाचे दाक्षिणात्य अभिनेत्याबरोबर प्रेमसंबंध होते. ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थबरोबर समांथा रिलेशनशिपमध्ये होती. बॉलिवूड व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करून प्रसिद्धी मिळवलेल्या सिद्धार्थच्या प्रेमात समांथा आकंठ बुडाली होती.
हेही वाचा>> समांथाचा जबरा फॅन! चाहत्याने प्रेमापोटी गावात बांधलं अभिनेत्रीचं मंदिर
श्रृती हसनबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थ व समांथामध्ये घट्ट मैत्री झाली. तेलुगू चित्रपट ‘जबरदस्त’च्या सेटवर समांथा व सिद्धार्थची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढू लागली. सिद्धार्थवरच्या प्रेमापोटी समांथा त्याच्याबरोबर लिव्ह इनमध्येही राहत होती. एका पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थने खास समंथासाठी डान्स परफॉर्म केला होता. समांथाला सिद्धार्थबरोबर लग्नही करायचं होतं. पण काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.
२०१४ मध्ये सिद्धार्थबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर समांथा व नागा चैतन्यमध्ये प्रेम फुलू लागलं. त्यानंतर २०१६साली नागा चैतन्यने समांथाला प्रपोज करत तिच्याबद्दल असलेल्या प्रेमभावना व्यक्त केल्या होत्या. समांथानेही नागा चैतन्यला लगेचच होकार दिला होता. त्यानंतर २०१७ साली समांथा व नागा चैतन्यने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. परंतु, लग्नाच्या चार वर्षांत त्यांच्या संसारात वादळ आलं. २०२१ साली नागा चैतन्यपासून घटस्फोट घेत समांथा वेगळी झाली.