माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंत व वकील काशिफ खानविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या दोघांनी बदनामीकारक विधानं केल्याचा आरोप वानखेडेंनी केला आहे. खान यांनी २०२३ मध्ये एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ त्यांनी दिला आहे. त्या मुलाखतीत खान यांनी जाणीवपूर्वक खोटी व निराधार वक्तव्ये केल्याचं वानखेडेंनी म्हटलं आहे.
वानखेडे माधम्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करतात असं विधान खान यांनी केलं होतं, असा आरोप या दाव्यामध्ये करण्यात आला आहे. भारतीय महसूल सेवा अधिकारी या नात्याने मी माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत काहिही चुकीचं केलेलं नाही. मी स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी असल्याचं वानखेडेंनी म्हटलं आहे.
समीर वानेखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल करताना ११ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. खान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपली बदनामी करणारी माहिती शेअर केली होती, तीच माहिती नंतर राखी सावंतने शेअर केली. या दोघांमुळे माझ्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला हानी पोहोचली, असं समीर वानखेडेंनी म्हटलं आहे. काशिफ खान हे मॉडेल मुनमुन धमेचाचे वकील आहेत. मुनमूनला २०२१ मध्ये आर्यन खानला पकडलेल्या छापेमारी प्रकरणात वानखेडे व त्यांच्या टीमने अटक केली होती.
“काशिफ खान व राखी सावंत यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून न पाहता बदनामीकारक विधानं केली होती. या प्रकरणात खान यांचा हेतू त्यावेळी चालू असलेल्या खटल्याबाबत लोकांच्या मनात माझी प्रतिमा मलीन करण्याचा होता, कारण त्यांची क्लायंट (मूनमून धमेचा) त्यावेळी संबंधित प्रकरणात आरोपी होती,” असं दाव्यात म्हटलं आहे.