अभिनेता समीर सोनी याने अभिनेत्री नीलम कोठारीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने पत्नीबरोबरच्या नात्याबरोबरच एखाद्या प्रोजेक्टमध्ये स्क्रीनवर दुसऱ्या अभिनेत्रींबरोबर जर इंटिमेट सीन करायचा असेल, तर ते एकमेकांची कशी परवानगी घेतात, याबद्दल खुलासा केला. एका वेब शोमधील इंटिमेट सीनमुळे नीलम नाराज झाली होती, यासंबंधीचा किस्सा समीर सोनीने सांगितला आहे.
“…त्यासाठी मी नीलमची परवानगी मागितली होती”
समीर सोनीने नुकतीच जीप्लस या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने एक आठवण सांगत म्हटले, “एका वेब शोमध्ये त्याच्या पात्राला महिला सहकलाकाराला किस करायचे होते. त्यासाठी मी नीलमची परवानगी मागितली होती. निर्मात्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली होती. स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळले की, मुलगा मुलीला किस करतो. एक किंवा दोन वेळा ठीक आहे; पण प्रत्येक एपिसोडच्या शेवटी किसिंग सीन होता. मला घरी येणे भाग होते. कारण- माझ्या बायकोला ती स्क्रिप्ट द्यायची होती. मी तिला सांगितले की, हे असे आहे. मी या शोला नाही म्हणू शकतो. हे एकच काम आहे, असे नाही. भविष्यात पुन्हा आणखी कामे मिळतील. तिने मोठ्या मनाने म्हटले की, हे तुझ्या करिअरसाठी चांगले आहे. मी तो शो पुन्हा बघणार नाही.”
“काही दिवसांनंतर नीलमचे त्यावर वेगळे मत होते. तिच्या एका मैत्रिणीने तो शो पाहिला आणि अडचणी निर्माण केल्या. मी त्या शोचे शूटिंग संपवले आणि एक दिवस घरी आल्यावर तिने मला शोबद्दल विचारले. तिने मला विचारले, “इंटिमेट सीन कसे होते?”, मी तिला म्हटले, “जे डायरेक्टरने सांगितले, ते ते मी केले. नशिबाने डायरेक्टर ही स्त्री होती. त्यानंतर तिने मला विचारले की, असे सीन किती वेळा होते? मग मी विचार केला की, हा संवाद वेगळ्या दिशेने जात आहे.”
नीलमच्या मनातील शंकेबद्दल स्पष्टीकरण देताना समीर सोनीने म्हटले, “तिच्या एका मैत्रिणीने तो शो पाहिला आणि तिला भडकवले की, तू कसे काय तुझ्या नवऱ्याला असे काहीतरी करू देतेस? मी तिला म्हटले की, मी तुला आधीच स्क्रिप्ट दाखवली होती. या क्षणाला मी त्याला तो शो प्रदर्शित करू नका, असे सांगू शकत नाही. कारण- त्यांनी आधीच मला स्क्रिप्ट दिली होती.
दरम्यान, नीलम कोठारी ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमुळे चर्चेत आहे. याच शोमध्ये तिने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल भाष्य केले होते आणि घटस्फोट घेण्याचे कारणदेखील सांगितले होते.