सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दरवर्षी रमजानमध्ये बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतात, त्यांच्या पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. सालाबादाप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला सलमान खान, शाहरुख खान, प्रीती झिंटा, शहनाज गिलसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले. इस्लामसाठी अभिनयक्षेत्र सोडणारी सना खानही इथे पतीबरोबर आली होती, पण तिचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधी सनाला बहीण म्हणायचा पती, नंतर लग्नासाठी मौलवीशी मिळून बोलला खोटं; आता सांगितली लव्ह स्टोरी, म्हणाला, “तिने मला…”

सना खानही पती अनसबरोबर इथे पोहोचली होती. त्यांनी मीडियाला फोटोसाठी पोजही दिल्या. पण त्यानंतर अचानक तिचा पती तिचा हात धरून वेगाने चालताना दिसला. सना खान गर्भवती आहे, या अवस्थेत तिला अशाप्रकारे ओढत घेऊन जाणाऱ्या अनसवर चाहते संतापले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सनाने पतीची बाजू मांडली आहे.

‘विरल भयानी’ नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सना आपण थकल्याचं म्हणताना दिसते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला होता. ‘तुम्ही तुमच्या गरोदर पत्नीशी नीट वागू शकत नसाल, तर उपवास करून काय उपयोग. कल्पना करा की तिला सर्वांसमोर अशी वागणूक दिली जात आहे, तर चार भिंतींच्या आड तिला कसे वागवले जातं असेल, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

नेटकऱ्याची कमेंट

‘तो तिला असे का ओढत आहे… ती गरोदर आहे. मूर्खासारखं वागणं!’ अशी कमेंट आणखी एका युजरने केली होती. यासारख्या असंख्य लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या, त्यानंतर सना खानने त्यावर स्पष्टीकरण दिलंय.

नेटकऱ्याची कमेंट

सना खान काय म्हणाली?

“हा व्हिडीओ नुकताच मी पाहिला. माझ्यासह माझ्या सर्व प्रिय बंधू आणि बहिणींना हा व्हिडीओ विचित्र वाटतोय, हे मला माहीत आहे. आम्ही बाहेर आल्यावर ड्रायव्हर आणि कारशी आमचा संपर्क तुटला. त्यामुळे मी नेहमीपेक्षा जास्त वेळ उभे होते. मला घाम येऊ लागला व मी अस्वस्थ झाले, त्यामुळे अनस मला पटकन आत नेत होता, जेणेकरून मी बसू शकेन आणि पाणी घेऊ शकेन. आम्हाला सर्व पाहुण्यांचे फोटो क्लिक करत असलेल्या पॅपला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी त्याला लवकर आत जाऊ असं म्हणाले होते. त्यामुळे कृपया हा व्हिडीओ पाहून इतर कोणतेही विचार करू नका हीच विनंती. तुमच्या काळजीबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार,” असं सना खानने या व्हिडीओवर कमेंट करत स्पष्टीकरण दिलंय.

सना खानची कमेंट

दरम्यान, सना खानने २०२० मध्ये मुफ्ती अनस सैय्यदशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. इस्लामसाठी आपण हे क्षेत्र सोडत असल्याचं सना म्हणाली होती. आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर सना गर्भवती आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sana khan clarifies viral video husband mufti anas dragging her at baba siddiqui iftar party hrc