Sanam Teri Kasam: राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ पाहायला मिळत आहे. २०१६मध्ये फ्लॉप झालेला हा चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहे. जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ आणि हिमेश रेशमियाच्या ‘बॅडएस रविकुमार’ या चित्रपटांवर पुन्हा प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ चांगलाच भारी पडला आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने मूळ कमाईचा आकडा ओलांडला आहे. ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत २७.९६ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सनम तेरी कसम’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणे हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तर अनुराग सिन्हा, मनष चौधरी, मुरली शर्मा आणि सुदेशी बेरी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील ‘खीच मेरी फोटो’ हे गाणं सुपरहिट झालं होतं. याच गाण्याची चित्रीकरणादरम्यान सरू म्हणजेच मावरा १०-१० मिनिटाला उलट्या करत होती. याचा किस्सा दिग्दर्शिका राधिका रावने सांगितला.

‘फिल्मीग्यान’शी संवाद साधताना राधिका राव किस्सा सांगत म्हणाली, “‘खीच मेरी फोटो’ गाण्यात मावरा एका माशाला किस करतानाचा सीन आहे. या गाण्यातील त्या सीनची रिहर्सल खोट्या माशाबरोबर केली होती. तोच मासा असिस्टंटने चित्रीकरणाच्या दिवशी आणला. मग मी म्हणाले, अरे हा खरा मासा वाटतं नाहीये. खेळणं वाटतंय. त्यामुळे संपूर्ण चित्रीकरण थांबलं. मग म्हटलं, आता एकच पर्याय आहे, खऱ्या माशाबरोबर चित्रीकरण करूया. त्यामुळे खरोखरचा मेलेला मासा आणला. तेव्हा संपूर्ण दिवस मावरा त्या माशाला किस करायची आणि उलटी करायला जायची. पूर्ण दिवस ती उलट्या करत ‘खीच मेरी फोटो’ गाण्यातील त्या सीनचं चित्रीकरण करत होती. तिच्या अंगाला माशाचा वास येऊ लागला होता. पण ती काय मुलगी आहे यार, तिला सॅल्यूट आहे. तिच्या जागी कोणी दुसरी असती तर म्हणाली असती की, आज नको. मी मरत आहे. पण ती तसं बोलली नाही.”

पुढे राधिका राव म्हणाली, “मावरा प्रत्येक १०-१० मिनिटाला उलटी करत होती, असं ते गाणं पाहून तुम्हाला वाटतंय का? तिने हे आम्हाला स्वतःहून सांगितलं नव्हतं. ती व्हॅनिटीमध्ये जाऊन उलटी करत होती. आम्हाला चित्रीकरणाच्या शेवटी कळालं. ती खूप जबरदस्त अभिनेत्री आहे. हॅट्स ऑफ.”

दरम्यान, ७ फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.१४ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली. ६.२२ कोटींचा व्यवसाय ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केला. त्यानंतर तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी अनुक्रमे ७.२१ कोटी, ३.५२ कोटी, ३.०७ कोटी आणि २.८० कोटींचा व्यवसाय ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanam teri kasam during the shooting of the song kheech meri photo mawra hocane vomited after 10 minutes pps