Sanam Teri Kasam Re-Release box office Collection Day 6 : २०१६ मध्ये आलेल्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. मात्र, चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची खूप चर्चा झाली. इंदर व सरू यांची लव्ह स्टोरी अनेकांना भावली होती. अखेर ९ वर्षांनी चित्रपट (७ फेब्रुवारीला) पुन्हा रिलीज झाला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
अलीकडे अनेक जुने चित्रपट पुन्हा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केले जात आहेत. आधी रिलीज झाले तेव्हा फ्लॉप ठरलेले सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चांगली कमाई करत आहेत. ‘लैला मजनू,’ ‘तुंबाड’ या चित्रपटांना री-रिलीजनंतर प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. याच यादीत आता ‘सनम तेरी कसम’चा समावेश झाला आहे. या चित्रपटाने ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.
सनम तेरी कसमचे कलेक्शन
हर्षवर्धन राणे व मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. या चित्रपटाने ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जवळपास २५ कोटींहून जास्त कमाई केली आहे. ‘सनम तेरी कसम’ ने चित्रपटाचे ९ वर्षांपूर्वीचे लाइफटाईम कलेक्शन फक्त ९ कोटी रुपये होते. पुन्हा रिलीज झाल्यानंतर, त्याने जुन्या कमाईला मागे टाकलं. पुन्हा रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी ‘सनम तेरी कसम’ने ५.१४ कोटी रुपयांची ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी ६.२२ कोटी आणि रविवारी ७.२१ कोटी कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटाने ३.५२ कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने ३.७ आणि सहाव्या दिवशी २.८० कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन २७.९६ कोटी रुपये झालं आहे.
राधिक राव आणि विनय सप्रू यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मिती ‘सनम तेरी कसम’चे बजेट २५ कोटी रुपये होतं. पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनचा हा पहिला भारतीय सिनेमा होता. तर हर्षवर्धन राणेने या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याचा हर्षवर्धनच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. पण आता ९ वर्षांनी या चित्रपटाने त्याचा निर्मिती खर्च वसूल केला आहे. यामुळे निर्मात्यांना मोठा फायदा झाला आहे. तसेच उशीरा का होईना, प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं, यासाठी हर्षवर्धन राणेदेखील खूप आनंदी आहे. सिनेविश्वात येणाऱ्या आउटसायडर नवीन कलाकारांना पाठिंबा द्या, माझ्याबरोबर जे केलं ते इतर कलाकारांबरोबर करू नका, असं हर्षवर्धन चित्रपटाच्या यशानंतर म्हणाला.