Sanam Teri Kasam Re-Release Collection : ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट ९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तेव्हा फ्लॉप झालेला हा चित्रपट सध्या पुन्हा प्रदर्शित झाल्याने चर्चेत आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेला हर्षवर्धन राणेचा ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट शुक्रवारी (७ फेब्रुवारी २०२५ रोजी) चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला ९ वर्षांपूर्वी न मिळू शकलेली लोकप्रियता आता मिळाली आहे.
‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरला आहे. हर्षवर्धन राणे व मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. याने आतापर्यंत मूळ रिलीजपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट री- रिलीज झाल्यानंतर नवीन चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जबरदस्त कमाई केली. चौथ्या दिवशीही चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने हिमेश रेशमियाचा सिनेमा व जुनैद-खुशीच्या ‘लवायापा’ यांना मागे टाकलंय.
सनम तेरी कसमचे कलेक्शन
‘सनम तेरी कसम’ ने पुन्हा रिलीज झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्या दिवशी ५.१४ कोटी रुपयांची ओपनिंग केली. पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने १८ कोटी कमावले. चित्रपटाचे ९ वर्षांपूर्वीचे लाइफटाईम कलेक्शन फक्त ९ कोटी रुपये होते. पुन्हा रिलीज झाल्यानंतर, त्याने जुन्या कमाईला मागे टाकलं. दुसऱ्या दिवशी ‘सनम तेरी कसम’ने ६.२२ कोटी आणि रविवारी ७.२१ कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे पहिल्या वीकेंडचे एकूण कलेक्शन १८.५७ कोटी झाले.
चित्रपटाने सोमवारी चौथ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. ‘सनम तेरी कसम’ पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना वाटलं की हा चित्रपट फार चांगली कामगिरी करणार नाही, पण कलेक्शन पाहता हे अंदाज नक्कीच चुकीचे ठरले आहेत. चित्रपटाने चौथ्या दिवशी अडीच कोटींची कमाई केली आहे. पण हे सुरुवातीचे आकडे आहेत, त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे. २०१६ च्या कमाईच्या तुलनेत चार दिवसांत सिनेमाने दीडपट जास्त कमाई झाली आहे.
‘Badass Ravi Kumar’ व ‘लवयापा’ची कमाई घटली
‘सनम तेरी कसम’ सोबतच हिमेश रेशमियाचा चित्रपट ‘Badass रविकुमार’ आणि जुनेद खानचा ‘लवयापा’ रिलीज झाले, पण या दोन्हींची कमाई घटली आले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चौथ्या दिवशी हिमेशच्या चित्रपटाने ६० लाख व ‘लवयापा’ने देखील ६० लाख कमावले. हिमेशच्या चित्रपटाने एकूण ६.७५ कोटी कमावले असून ‘लवयापा’चे कलेक्शन ५.१५ कोटी रुपये झाले आहे.