रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हेदेखील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. चित्रपटावर टीका करणाऱ्यांचा संदीप यांनी चांगलाच समाचार घेतला. आता अशातच संदीप यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. संदीप यांनी आत्तापर्यंत तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे ते म्हणजे ‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’ आणि ‘अॅनिमल’. या तीनही चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरपूर टीका केली, परंतु हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरले.
‘अॅनिमल’ला मिळालेलं यश तर त्यांच्यासाठी अभूतपूर्व असंच होतं अन् त्यासाठीच त्यांनी नुकतंच त्यांचे केस अर्पण केल्याचं वृत्त समोर येत आहे. नुकतंच आंध्रप्रदेशच्या तिरूमला मंदिराला भेट देऊन बाहेर पडताना संदीप मीडियासमोर आले तेव्हा त्यांचा अवतार पाहून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटले. मंदिरात संदीप यांनी त्यांचे केस अर्पण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचा स्कार्फसह संदीप मंदिराच्या आवारातून बाहेर येत होते. बाहेर पडताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला तसेच काही चाहत्यांबरोबर फोटोदेखील काढले. ‘अॅनिमल’च्या यशाखातर संदीप यांनी त्यांच्या डोक्यावरचे केस अर्पण केल्याचं स्पष्ट होत आहे. पुढील चित्रपट कोणता याबद्दल विचारणा होताच संदीप यांनी प्रभासच्या आगामी ‘स्पिरीट’चे नाव घेतले. लवकरच संदीप ‘स्पिरीट’वर काम सुरू करणार असून त्यानंतर ‘अॅनिमल पार्क’चं काम ते हाती घेणार आहेत.