संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून याला जबरदस्त प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला आहे. चित्रपटातील बोल्ड सीन्स, रक्तपात, हिंसा यामुळे चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळालं असल्याने याची जबरदस्त चर्चा होत आहे. ‘अॅनिमल’ हा संदीप रेड्डी वांगा यांचा तिसराच चित्रपट आहे. याआधी त्यांनी ‘अर्जुन रेड्डी’ व त्याचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते, अन् दोन्ही चित्रपटांवेळी चांगलाच वाद निर्माण झाला होता.
चित्रपटातील कमकुवत स्त्रियांचे पात्र अन् किसिंग सीन यावरुन संदीप रेड्डी वांगा यांच्या दोन्ही चित्रपटांवर भरपुर टीका झाली. याबरोबरच ‘कबीर सिंह’मध्ये परवानगी न घेता किस करणं या सीनमुळेही संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका झाली होती. नुकतंच ‘अॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीमध्ये संदीप यांनी यावर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट
संदीप या टीकाकारांना फारसं मनावर घेत नाहीत हे त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. ‘सीएनएन न्यूज १८’ला मुलाखत देताना संदीप म्हणाले, “मी या गोष्टीचा जास्त विचार करत नाही. ‘कबीर सिंह’ हा चित्रपट दुराचाराला अजिबात प्रोत्साहन देणारा नाही. फारफार तर चार ते पाच लोकांना ही गोष्ट खटकली असेल ज्यामुळे जास्त चर्चा झाली, परंतु मी त्या गोष्टींकडे फारसं गांभीर्याने बघत नाही.”
पुढे संदीप म्हणाले, “चार लोकांनी असे लेख लिहिले ज्यामुळे आणखी काही लोकांना प्रेरणा मिळाली. २० लोकांहून अधिक कुणालाही या गोष्टीवर आपत्ती नव्हती. तो त्यांचा दृष्टिकोन होता, आता त्याबद्दल चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, आता कबीर सिंहला विसरायला हवं.” संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबरच ‘कबीर सिंह’मधील मुख्य कलाकार शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांनीही संदीप यांची बाजू घेत त्यावेळी स्टँड घेतला होता. आता ‘अॅनिमल’मधीलही बऱ्याच सीन्सवरून वाद निर्माण होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.