बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा दिग्गज अभिनेत्री नर्गिस व सुनील दत्त यांचा मुलगा आहे. मात्र, संजय दत्तला वयाच्या २१ व्या वर्षी मातृशोकाला सामोरे जावे लागले. नर्गिस यांचा वयाच्या ५१ व्या वर्षी कर्करोगाने मृत्यू झाला.

जेव्हा परदेशात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तेव्हा त्यांचे कुटुंब वर्षभर परदेशात राहिले. यादरम्यानच संजय दत्तला अमली पदार्थांचे व्यसन लागले. त्यामुळे त्याच्या पदार्पणाचा चित्रपट दाखवण्याची त्याच्या आईची शेवटची इच्छा तो पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे संजय दत्त नैराश्यात गेला होता.

“तेव्हा संजूने ड्रग्ज घ्यायला…”

संजय दत्तची लहान बहीण प्रिया दत्तने नुकतीच विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रिया दत्तने सांगितले की, १९८०-८१ हा संपूर्ण काळ बदलून टाकणारा होता. प्रिया दत्तने या मुलाखतीत म्हटले की, जेव्हा आई आजारी होती. तेव्हा संजूने ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. आम्ही परदेशात असायचो. त्या काळात संजू भारतात असायचा. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवायला कोणीही नसे. आमचे लक्ष आईच्या आजारपणावर होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

प्रिया दत्त पुढे म्हणाली की, जेव्हा आईचे निधन झाले. तेव्हा परिस्थिती फार नियंत्रणाबाहेर गेली. तो नैराश्यात गेला. तो क्वचितच बोलत असे. त्याच्या भावना तो उघडपणे व्यक्त करीत नसे. आईने त्याला अनेकदा सांगितले होते की, तुझ्या चित्रपटाच्या प्रीमियरला मी हजर असेन. भलेही मला स्ट्रेचरवरून यायला लागले तरी चालेल; पण मी येईन. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आईचे निधन झाले.

संजयचा ‘रॉकी’ चित्रपट हा ६ मे रोजी प्रदर्शित होणार होता. वडिलांनी आईला चित्रपटाच्या प्रीमियरसाठी नेण्यासाठी सगळी तयारी केली होती. मात्र, त्याच्या तीन दिवस आधीच आईचे निधन झाले. ३ मे रोजी तिचे निधन झाले. याचा संजय दत्तवर मोठा विपरीत परिणाम झाला. आईने त्याचा पदार्पणाचा चित्रपट पाहिला नाही. तिची शेवटची इच्छा तो पूर्ण करू शकला नाही. जेव्हा ‘रॉकी’चा प्रीमियर सोहळा पार पडला. तेव्हा आम्ही वडिलांशेजारची जागा आईसाठी रिकामी ठेवली होती.

दरम्यान, ‘रॉकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्या वर्षात तो सर्वांत जास्त कमाई करणारा १० वा चित्रपट होता. पण, त्या यशाचे संजय दत्तला काही वाटले नाही. तो नैराश्यात गेला आणि त्याला ड्रग्जचे व्यसन लागले. त्यानंतर हे व्यसन सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. प्रिया दत्त म्हणाली की, आजही त्याला आईला त्याचा पदार्पणाचा चित्रपट दाखवू न शकल्याचा पश्चात्ताप आहे.