बॉलीवूड अभिनेता संजय दत्तबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. संजयने अक्षय कुमारचा चित्रपट सोडला आहे. अलीकडच्या काळात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या संजय दत्तने ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्याने शूटिंग सुरू केलं होतं, नंतर त्याने हा सिनेमा सोडला आहे.
संजय बॉलीवूड सिनेमा ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार नाही. गेल्यावर्षीच संजय या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाच्या टीमचा भाग झाला होता, पण आता त्याने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बॉलीवूड हंगामा’ने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “संजय दत्तने चित्रपट सोडण्याचं कारण तारखा असल्याचं म्हटलं आहे. त्याने चित्रपट सोडण्यामागील सर्व कारणं त्याचा मित्र व चित्रपटाचा मुख्य अभिनेता अक्षय कुमारला सांगितली आहेत. त्यानेही संजयची कारणं मान्य केली असून दोघांमध्ये यावरून काहीही कटुता नाही. संजय दत्तला वाटतंय की वेलकम टू द जंगलचं शूटिंग नियोजित पद्धतीने होत नाहीये. तसेच स्क्रिप्टमध्ये बरेच बदल झाले आहेत. या शूटिंगचा त्याच्या इतर चित्रपटांच्या तारखांवर परिणाम होतोय, त्यामुळे त्याने हा सिनेमा सोडला.”
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, संजयने या चित्रपटासाठी १५ दिवस शूट केलं आहे आणि निर्माते ते शूट ठेवावं की त्याची भूमिका चित्रपटातून वगळावी याबद्दल संभ्रमात आहेत. “संजय दत्तने पहिल्या शेड्यूलमध्ये वेलकम टू द जंगलच्या काही विनोदी दृश्यांचं शूटिंग केलं आहे. त्यामुळे निर्मात्यांना ते वगळण्याची इच्छा नाही, कदाचित ते संजयचं ते शूट त्याच्या कॅमिओच्या रुपात ठेवू शकतात,” असंही सूत्राने म्हटलं आहे. मात्र याबाबत संजय दत्तची टीम किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
संजयने सिनेमा सोडला असला तरी यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, परेश रावल, अर्शद वारसी, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, मुकेश तिवारी, झाकीर हुसेन, यशपाल शर्मा, सयाजी शिंदे, जॅकी श्रॉफ आणि आफताब शिवदासानी अशा कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…
संजय दत्त यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो अक्षय कुमारबरोबरच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘केडी- द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचाही भाग असणार आहे. प्रभासच्या पुढच्या ‘द राजा साहेब’ या चित्रपटातही संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत असेल अशी चर्चा आहे. याशिवाय १४ जून रोजी रिलीज होणार असलेल्या ‘डबल स्मार्ट’ या तेलगू चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.