शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि बॉलिवूडचं खास नातं होतं. इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. चित्रपट प्रदर्शनात अडथळे येत असतील तर अनेक निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते त्यांच्याकडे सल्ला किंवा मदत घेण्यासाठी जात असत. अशीच काहीशी परिस्थिती १९९५ साली प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस खासदार सुनील दत्त यांच्यावर ओढावली होती. ज्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांनी सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तची सुटका झाली होती. संजयला १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
संजय दत्त १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगून १७ ऑक्टोबर १९९५ रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला होता. यासाठी सुनील दत्त यांना बाळासाहेब ठाकरे यांचं सहकार्य मिळालं होतं असं बोललं जातं. जेव्हा संजय दत्त तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला ‘मातोश्री’वर गेला होता असं बोललं जातं.
आणखी वाचा-…अन् दिलीप कुमार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीमध्ये पडली होती फूट, नेमकं काय घडलं होतं?
संजय दत्त आणि मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरण
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एप्रिल १९९४ मध्ये संजय दत्तला अटक करण्यात आली आणि ४ जुलै १९९४ रोजी त्याचा जामीन रद्द करून त्याला शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी तुरुंगात पाठवण्यात आले. त्याच्यावर धोकादायक हत्यारं लपवण्याचा आरोप होता. मुंबईत स्फोट झाल्यानंतर संजय दत्तच्या घरातून ३ एके ५६, २५ हॅन्ड ग्रेनेड आणि एक ९ एमएम पिस्तुल जप्त करण्यात आली होती. ही सर्व हत्यारं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने संजय दत्तच्या घरी ठेवली होती असं बोललं जातं.
या प्रकरणानंतर संजय दत्त १५ महिने तुरुंगात राहिला होता. त्यानंतर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचला होता. त्यावेळी त्याने बाळासाहेब ठाकरे यांना मिठी मारली आणि मग बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला चांगलंच खडसावलं. “आता तुझे वडील सांगतील त्याप्रमाणेच वाग, कोणाचंही काही ऐकून कोणताही निर्णय घेऊ नकोस.” अशा शब्दांत बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्तची कानउघाडणी केली होती. त्यावेळी तिथे संजयचे वडील सुनील दत्त आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हेही उपस्थित होते.
आणखी वाचा-हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता- हेडली
घटनेचा दुसरा पैलू
दरम्यान यावेळीचा या घटनेचा दुसरा पैलू असाही सांगितला जातो की, जेव्हा संजय दत्तला १९९४ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झाली तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं. सुनील दत्त काँग्रेसचे खासदार होते. मात्र त्यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर त्यांची मदत करण्यास तत्कालीन नेते शरद पवार आणि मुरली देवडा यांनी नकार दिला होता. तेव्हा सुनील दत्त यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून या प्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. १९९५ मध्ये शिवसेना आणि भाजपाचं सरकार सत्तेत आलं. त्यावेळी बाळासाहेब यांच्या हस्तक्षेपानंतर १७ ऑक्टोबर १९९५ रोजी संजय दत्तची जामिनावर सुटका झाली. पण नंतर दोन महिन्यांतच म्हणजे डिसेंबर १९९५ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
या घटनेनंतर बाळासाहेब ठाकरे आणि संजय दत्त यांच्या कुटुंबियांचे संबंध घनिष्ठ झाले. नोव्हेंबर २०१२ मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत खूपच गंभीर झाली होती तेव्हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला होता, “बाळासाहेब माझ्यासाठी वडिलांप्रमाणे आहेत. माझ्या आयुष्यातल्या सर्वात कठीण काळात जेव्हा मला कोणीच साथ दिली नाही, मला मदत केली नाही तेव्हा तेच माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले होते.” दरम्यान १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं.