राजेश खन्ना(Rajesh Khanna), संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, शशी कपूर या दिग्गज अभिनेत्यांच्या काळात सेटवर उशिरा येणे हा सुपरस्टार्समध्ये नियम बनला होता. जितका मोठा स्टार, तितका तो सेटवर उशिरा येत असे. संजीव कुमार(Sanjeev Kumar), शत्रुघ्न सिन्हा(Shatrughan Sinha) यांच्यासारखे अभिनेते उशिरा येण्यासाठी कुप्रसिद्ध होते. आता अभिनेत्री शबाना आझमी यांनी एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे. शबाना आझमींनी ९० च्या दशकातील जवळजवळ सर्व अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. आता मुलाखतीत अभिनेते त्यांना सेटवर वाट पाहायला लावायचे, असे म्हटले असून चित्रपटसृष्टीत आल्यानंतर वहिदा रेहमान यांनी त्यांना काय सल्ला दिला होता, याचादेखील त्यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाल्या शबाना आझमी?
दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी नुकतीच रेडिओ नशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “आम्ही १२ चित्रपटात एकाच वेळी काम करत असू. मी संजीव कुमार यांच्याबरोबर ‘नमकीन’ या चित्रपटात काम करत होते. या चित्रपटाचे शूटिंग फिल्म सिटीमध्ये चालू होते. सकाळी ७ वाजता शिफ्ट सुरू व्हायची; पण संजीव कुमार कधीही साडेअकराच्या आधी आले नाहीत. मी माझ्या आईला विनंती करत असायचे की, आई मला सकाळी लवकर उठवत जाऊ नकोस. कारण हीरो स्वत: कधीही लवकर येत नाही. मात्र, माझी आई स्वत:अभिनेत्री असल्याने व तिची पार्श्वभूमी थिएटरची असल्याने तिने मला सल्ला दिला होता. याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही. तू तुझ्या निर्मात्यांना वचन दिले आहेस आणि त्यामुळे जरी शूटिंग सुरू होत नसले तरी तू तिथे ७ ला पोहोचत जा.”
सहकलाकारांच्या आळशीपणाचा अभिनेत्रीच्या वेळापत्रकावर परिणाम होत असे. कारण त्या एकाच वेळी विविध चित्रपटांत काम करीत होत्या. यावर बोलताना शबाना आझमींनी म्हटले, “संजीव कुमार साडेअकरालाच यायचे आणि त्यानंतर पाच-सहा शॉट झाल्यानंतर मी फिल्मीस्तानला जाण्यासाठी घाई करत असे. तिथे २ ते १० शिफ्ट असायची. शत्रुघ्न सिन्हा ७ ला यायचे. यांच्या तुलनेच राजेश खन्ना उत्तम होते. ते शत्रुघ्न सिन्हा व संजीव कुमार यांच्याइतके वाईट नव्हते.”
याबरोबरच वहिदा रेहमान यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “मला वहिदा रेहमान यांनी संयम राखण्याचा दिलेला सल्ला आजही लक्षात आहे. त्यांनी मला म्हटले होते की, इथे तुला खूप वाट पाहावी लागेल. पण, त्यामुळे तू तुझा मूड खराब केलास तर त्याचा परिणाम तुझ्या कामावर होईल.” भारतीय अभिनेत्यांची तुलना हॉलीवूडच्या अभिनेत्यांशी करताना शबाना आझमींनी म्हटले, “सर्वांत मोठा स्टारही तिथे उशिरा येऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांचे वेळापत्रक बिघडते. त्यांना जज केले जाऊ शकते. शिस्त सगळ्यात महत्त्वाची आहे.”
हेही वाचा: प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या
आता इतक्या वर्षांत बॉलीवूडमध्ये बरेच चांगले बदल झाल्याचा विश्वास व्यक्त करत शबाना आझमींनी म्हटले, “मला विश्वास आहे की बॉलीवूडमध्ये या गोष्टी आता बदलल्या आहेत, नाही तर याआधी शशी कपूर व अमिताभ बच्चन हे दोनच अभिनेते असे होते, जे वक्तशीर होते.” आता शबाना आझमींना नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.