Chhaava Movie : ‘छावा’ सिनेमाचा क्लासमॅक्स पाहून सिनेमागृहात भावनिक वातावरण निर्माण होत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. या सिनेमाला प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये देखील ‘छावा’ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. याचदरम्यान गुजरातमधील भरूच येथील एका चित्रपटगृहात ‘छावा’ चित्रपट सुरू असताना प्रेक्षकाने भावनिक होऊन सिनेमागृहाचा पडदा फाडल्याची घटना घडली.
चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करत असल्याचा क्लायमॅक्सचा सीन सुरू होता याचवेळी या तरुणाने सिनेमागृहाचा पडदा फाडला. मल्टिप्लेक्सचे कर्मचारी धावत येईपर्यंत त्याने पडद्याचं नुकसान केलेलं होतं. या घटनेवर ‘छावा’ सिनेमात रायाजीची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या संतोष जुवेकरने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने सगळ्या प्रेक्षकांना इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये जबाबदारीने वागण्याची विनंती केली आहे.
संतोष म्हणतो, “मित्रांनो! या १४ फेब्रुवारी छावा सिनेमा प्रदर्शित झाला. मॅडडॉक निर्मिती संस्था, लक्ष्मण उतेकर सर, विकी कौशल, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, रश्मिका, विनीत सिंह, आशिष पाथोडे, शुभंकर एकबोटे, डायना पेंटी असे सगळे दमदार कलाकार यामध्ये आहेत. सिनेमा सर्वांच्या मनात घर करणार याची मला खात्री होती…. तुम्हाला सर्वांना छावाच्या टीमकडून खूप प्रेम.”
अभिनेता पुढे म्हणाला, “सध्या चित्रपटासंदर्भातले अनेक रील्स व्हिडीओ मी पाहतोय. प्रेक्षक सुन्न होऊन चित्रपटगृहाबाहेर पडत आहेत. राजांचं शौर्य, बलिदान पाहून मन हेलावून जातं. मला आजवरच्या करिअरमध्ये अनेक चांगले-चांगले चित्रपट मिळाले. पण, हा चित्रपट वेगळा आहे…याला चित्रपट न समजता मी माझ्या राजांचा आशीर्वाद समजतो. खरंच लक्ष्मण सरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि ही संधी माझ्या पदरात टाकली…सर तुम्हाला खूप प्रेम. हा असा सिनेमा करणं फार गरजेचं होतं. कारण, आपल्या राजांचं बलिदान येत्या पिढीला समजलं पाहिजे. हा सिनेमा म्हणजे माझ्या राजांचं देऊळ आहे. या मंदिराची छोटीशी वीट होण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलंय.”
#Chhaava ફિલ્મના નાઈટ શોમાં એક વ્યક્તિ આવ્યો અને સ્ક્રિનનો પરદો ફાડી નાખ્યો!
— MG Vimal – વિમલ પ્રજાપતિ (@mgvimal_12) February 17, 2025
ઘટનાઃ blue chip complex, Bharuch#Bharuch #Chhava #VickyKaushal #multiplex #screen #Damage #bluechipcomplex pic.twitter.com/nVMEnDo8Zz
“मी एक व्हिडीओ पाहिला कोणत्या तरी थिएटरमध्ये भावनेच्या भरात अर्थात त्या भावनांचा मी आदर करतो. पण, तो तरुण सिनेमागृहाचा पडदा फाडताना मला दिसला. मी हात जोडून विनंती करतो की, तुमच्या भावनांवर थोडंसं नियंत्रण ठेवा. राजांचा चित्रपट पाहून, त्यांचं बलिदान पाहून आपल्या सगळ्यांचं रक्त सळसळतं यात काहीच वाद नाही. पण, कोणाचं नुकसान होणार नाही, कोणालाही कोणत्या गोष्टीची इजा होणार नाही याची काळजी घ्या. पडदा फाडून काहीच मिळणार नाही, कारण पुन्हा पडदा बदलेपर्यंत सिनेमा इतरांना पाहायला मिळणार नाही. कुठल्याही गोष्टीचं नुकसान होता कामा नये. अनेकांची यामागे मेहनत आहे. कोणाच्या पोटावर लाथ मारू नका…आपल्याला राजांनी जे शिकवलं आहे, त्यांच्या विचारांवर आपण चालायचं आहे हे लक्षात असू द्या.” असं संतोष जुवेकरने सर्व प्रेक्षकांना सांगितलं.