Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात रायाजी ही भूमिका साकारणार आहे. नुकतीच त्याने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी संतोषने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक अनुभव सांगितले. याशिवाय सेटवर विकी कौशलबरोबर कसं बॉण्डिंग होतं? याचा खुलासा सुद्धा अभिनेत्याने या मुलाखतीत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष जुवेकर म्हणाला, “छावा’चं शूटिंग वाईला सुरू होतं. जवळपास १ महिना १० दिवसांचं शेड्यूल होतं आणि त्याच्यात दोन दिवस मला गॅप होता. मला शूटिंग नव्हतं… मला प्रोडक्शनचा फोन आला की, सर तुम्ही आहात का? की बाहेर गेला आहात. तुम्ही सेटवर येऊ शकता का? मी त्यांना म्हणालो, माझं आज काहीच शूटिंग नाहीये. तर ते समोरून म्हणाले, नाही… विकी सरांनी तुम्हाला बोलावलं आहे.”

संतोष जुवेकर पुढे म्हणाला, “मी सेटवर गेलो लक्ष्मण सरांना विचारलं, ते म्हणाले… ‘अरे काही नाही त्या विकीला करमत नाही म्हणून तो बोलला बोलावून घ्या’ मी गेलो…विकी लगेच म्हणाला, ‘आता मजा येणार’ आम्ही सेटवर खूपच धमाल केली. एकदा आम्ही जेवायला बसलो होतो. त्यावेळी विकीचा मदतनीस आला आणि त्याने विचारलं तुम्ही जेवला नाही आहात ना? जरा थांबा सरांनी जेवण आणलंय. त्या दिवशी सेटवर विकीने सर्वांसाठी त्याच्या घरून जेवण मागवलं होतं. आम्ही सगळे एकत्र जेवलो. सेटवर एकत्र धमाल करत आम्ही हा सुंदर चित्रपट बनवला आहे.”

“सेटवर विकीच्या तीन व्हॅनिटी असायच्या. फूड व्हॅनिटी, जिम व्हॅनिटी आणि त्याची एक व्हॅनिटी. त्याची जी फूड व्हॅनिटी होती तिथे लिहिलं होतं की, ‘स्पेशली क्रिएटेड फॉर मिस्टर विकी कौशल’ तेव्हा मी सहज म्हटलं एक दिवस आपलं नावही असंच लिहिलेलं असेल. तेव्हा विकी मला म्हणाला, “पक्का होगा…” त्याच्या वागण्यातून राहणीमानातून एक आपलेपणा जाणवतो. आज ज्या पातळीवर तो पोहोचला आहे ते सगळं तो डिझर्व्ह करतो.” असं संतोष जुवेकरने सांगितलं.

दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava movie sva 00