बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)वर जानेवारी महिन्यात हल्ला झाला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीने त्याच्यावर चाकूहल्ला केला होता. यामध्ये अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली होती. या हल्लेखोराला पोलिसांनी अटकही केली आहे. आता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने यावर वक्तव्य केले आहे. या घटनेचा तिच्यावर काय परिणाम झाला, यावरही सारा अली खानने वक्तव्य केले.

मला माझे संपूर्ण आयुष्य…

सारा अली खानने नुकताच एनडीटीटीव्ही युवाबरोबर संवाद साधला. यावेळी सारा अली खानने सांगितले की सैफ अली खान या हल्ल्यातून सावरला आहे, त्याची प्रकृती ठीक आहे, याबद्दल आमचे संपूर्ण कुटुंब कृतज्ञ आहे. पुढे अभिनेत्री वडिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत म्हणाली, “हल्ल्यात काहीतरी भयंकर घडलं असतं. या घटनेमुळे याची जाणीव झाली की आपल्यासाठी खरंच काय महत्त्वाचे आहे. मला माझे संपूर्ण आयुष्य आठवले. तुम्हाला जे आयुष्य मिळाले आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहणे महत्त्वाचे आहे, अशा घटनांमुळे याची जाणीव होते.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर कुटुंबातील जवळीकता वाढली आहे का? यावर सारा अली खान म्हणाली, “ते माझे वडील आहेत, आम्ही आधीपासूनच एकमेकांच्या जवळ आहोत. या हल्ल्यामुळे मला याची जाणीव झाली की तुमचं आयुष्य एका रात्रीत बदलू शकतं, त्यामुळे रोजचा दिवस साजरा केला पाहिजे”, असे म्हणत सारा अली खानने सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आयुष्याची किंमत प्रखरतेने समजल्याचे म्हटले आहे.

१६ जानेवारी २०२५ ला सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील घरात चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. या संपूर्ण काळात त्याचे कुटुंब त्याच्याबरोबर असल्याचे दिसले. यानंतर सैफ अली खानने दिलेल्या मुलाखतीत सुरुवातीला ज्याने हल्ला केला, त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती असे म्हटले. तसेच मुलांच्या प्रतिक्रिया काय होत्या, यावर बोलताना तैमूरला असे वाटत होते की ज्याने हल्ला केला त्याला माफ करावे. तसेच जेहने त्याला त्याची प्लास्टिकची तलवार आणून दिली होती, असाही खुलासा केला.

दरम्यान, सारा अली खान व इब्राहिम अली खान हे सैफ अली खान व अमृता सिंह यांची मुले आहेत. सैफ अली खान व अमृता सिंह यांनी १९९१ ला लग्नगाठ बांधली होती. २००४ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सैफ अली खानने करिना कपूरबरोबर २०१२ ला लग्नगाठ बांधली. त्यांना तैमूर व जेह ही मुले आहेत.