सैफ अली खान व अमृता सिंह यांचा घटस्फोट झाल्यावर त्यांची मुलं सारा व इब्राहिम यांचा सांभाळ अभिनेत्रीने एकटीने केला. सारा व इब्राहिम आईबरोबरच राहतात. साराचे आई-वडील विभक्त झाले असले तरी ती आजी शर्मिला टागोर यांच्या खूप जवळ आहे. सारा अनेकदा आजीबद्दल बोलत असते. दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात साराने तिचे आई-वडील अमृता सिंह आणि सैफ अली खान यांच्या घटस्फोटाच्या जवळपास २० वर्षांनीही शर्मिला त्यांना आयुष्यात कशाप्रकारे साथ देत आहेत याबद्दल खुलासा केला.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सारा म्हणाली की तिचे आई आणि वडील एकत्र राहत नसले तरी शर्मिला यांचं अमृताबरोबर खूप चांगलं इक्वेशन आहे. “माझ्या आईला आई-वडील नाहीत, पण मला किंवा इब्राहिमला काही झालं तर मला माहीत आहे की ती एकटी नसेल, कारण बडी अम्मा (शर्मिला टागोर) तिथे असतील आणि तेच आमच्यासाठी सर्व काही आहे,” असं साराने नमूद केलं.
जान्हवी कपूरच्या काकूचं पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विधान; म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना…”
आयुष्यात यश मिळालं की खूप लोक कौतुक करणारे असतात, पण जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा आजी शर्मिला धावून आल्या, असं साराने सांगितलं. “मी आयुष्यात एका अशा टप्प्यातून गेले, जेव्हा मला आधाराची खूप गरज होती आणि तिथे बडी अम्मा माझ्यासाठी धावून आल्या. त्या माझ्यासाठी उपलब्ध होत्या, अशा वेळीच तुम्हाला नातेसंबंधांची खरी किंमत कळते,” असं सारा म्हणाली.
सैफपासून विभक्त झाल्यानंतर अमृताला शांत व्हायला वेळ हवा होता, असं शर्मिला यांनी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये उघड केलं होतं. “जेव्हा तुम्ही इतका काळ एकत्र असता आणि तुम्हाला दोन सुंदर मुलं असतात, अशावेळी ब्रेकअप सोपं नसतं. त्या टप्प्यावर एकमेकांशी संवाद साधणं कठीण असतं आणि त्याचा त्रासही खूप होतो. तो टप्पा चांगला नव्हता, पण मी प्रयत्न केला. तिला शांत होण्यासाठी वेळ हवा होता. दोघांनी यावर काम करण्याचा प्रयत्न केला होता, पण यश आलं नाही. खरं तर हे फक्त एकमेकांपासून दूर राहण्यापुरतंच नाही, तर यात इतरही अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत. तो आमच्यासाठी अजिबात आनंदाचा काळ नव्हता, कारण इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता आणि आम्हाला मुलं खूप आवडायची. खासकरून टायगरला इब्राहिम खूप आवडायचा आणि तो म्हणायचा, ‘हा खूप चांगला मुलगा आहे’ पण त्यांना एकत्र फार वेळ मिळाला नाही,” असं शर्मिला सैफ व अमृताच्या घटस्फोटाबाबत बोलताना म्हणाल्या होत्या.