एका वेगळ्या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी असताना अभिनयाची आवड जोपासण्यासाठी आपलं करिअर सोडणारे अनेक जण आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी नोकरी सोडून अभिनयाची वाट निवडली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत, जितेंद्र कुमार आणि विकी कौशल ही त्यापैकीच काही नावं आहेत. असाच आणखी एक अभिनेता आहे, ज्याने आयआयटी दिल्लीतून पदवी घेतली, पण अभिनयाची आवड असल्याने तो सिनेसृष्टीत आला.
या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली. नोकरी सोडून तो या क्षेत्रात आला आणि त्याने यशही मिळवलं. या अभिनेत्याने कोंकणा सेन शर्मा, मनोज बाजपेयी, विकी कौशल या आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केलं आहे.
आज आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव अमोल पाराशर आहे. अमोल हा ओटीटीवरील एक प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने वेब सीरिजशिवाय बॉलीवूड चित्रपटांमध्येही आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमोलने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी दिल्लीमधून मेकॅनिकल इंजिनीअरची पदवी घेतली. पण अभिनयाची आवड असल्याने त्याने झेडएस असोसिएट्समधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि या क्षेत्रात आला.
अमोल पाराशर ‘टीव्हीएफ ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमध्ये चित्वन शर्माची भूमिका साकारून आणि शुजित सरकारच्या ‘सरदार उधम’मध्ये भगतसिंगची भूमिका साकारून लोकप्रिय झाला. अमोलने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोंकणा सेन शर्मासह ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ आणि मनोज बाजपेयीबरोबर ‘ट्रॅफिक’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष भट्ट निर्मित ‘कॅश’ या चित्रपटातून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. अमोल ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम करतोय. त्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.