बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च २०२३ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतिश यांच्या निधनानंतर कलाक्षेत्राला मोठा धक्का बसला. शिवाय त्यांचं संपूर्ण कुटुंबही कोलमडून गेलं. त्यांच्यामागे पत्नी शशी कौशिक व मुलगी वंशिका असा परिवार आहे. १३ एप्रिलला सतिश यांचा ६७वा वाढदिवस होता. यावेळी अनुपम खेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमाला अनिल कपूर यांच्यासह अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. दरम्यान अनुपम यांनी या कार्यक्रमामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वंशिकाने वडिलांसाठी लिहिलेलं पत्र ती वाचताना दिसत आहे. वंशिका पत्र वाचत असताना अनुपम यांनाही अश्रू अनावर झाले. तसेच शशी कौशिक, अनिल कपूर यांच्यासह कार्यक्रमामधील उपस्थित मंडळीही भावुक झालेले या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”
वडिलांना वंशिकाचं भावुक पत्र
वंशिकाने म्हटलं, “तुमच्या बऱ्याच मित्रांनी मला खचून जाऊ नकोस असं सांगितलं. पण मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. मला तुमची खूप आठवण येते. असं काही घडणार आहे हे मला आधीच माहिती असतं तर मी शाळेमध्येच गेली नसती. तुमच्याबरोबरच एकत्रित वेळ घालवला असता, तुम्हाला एकदा मिठी मारता आली असती. पण तुम्ही तोपर्यंत निघून गेला होतात. माझा अभ्यास पूर्ण झाला नाही की, आई ओरडते. पण आता मला तिच्या ओरडण्यापासून कोण वाचवणार?. मला आता शाळेमध्ये जाण्याचीही इच्छा होत नाही. माझे मित्र-मैत्रिणी मला काय म्हणतील? कृपया माझ्या नेहमी माझ्या स्वप्नामध्ये या”.
“तुमच्यासाठी आम्ही पूजा ठेवली आहे. पण तुम्ही पुर्नजन्म घेऊ नका. ९०व्या वर्षी आपण दोघं पुन्हा भेटू. पप्पा तुम्ही मला आठवणीमध्ये ठेवा आणि माझ्याही आठवणींमध्ये तुम्ही कायम राहणार. माझ्या हृदयामध्ये तुमच्यासाठी नेहमीच एक वेगळं स्थान राहील. मला कधीही मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर कायम असणार. माझ्याजवळ जगातील सगळ्यात बेस्ट वडील होते”. वंशिकाने वडिलांना लिहिलेलं हे पत्र खरंच डोळ्यात पाणी आणणारं आहे.