ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही त्यांच्या अचानक जाण्यानं धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता त्यांच्या मुलीबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीबरोबरचा एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डिसेंबर २०२२ चा आहे. या व्हिडीओमध्ये वंशिका तिचे वडील सतीश कौशिक यांच्यासह रील बनवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ‘सॅव्हेज लव्ह’ या गाण्यावर ती तिच्या वडिलांना कोरिओग्राफी शिकवत आहे. हा व्हिडीओ स्वतः सतीश कौशिक यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तो सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेही भावूक झाले आहेत.
सतीश कौशिक यांचा मुलगी वंशिकाबरोबरचा हा क्यूट व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही भावूक झाले आहेत. ते या व्हिडीओवर कमेंट्स करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच ‘या मुलीसाठी हा खूप दुःखद काळ आहे. वडिलांशिवाय जीवन जगणं खूप कठीण आहे,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर, ‘सतीश सर तुमची कमतरता कायम जाणवेल’, असं एका नेटकऱ्याने लिहिलं.
सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका अवघी १० वर्षांची आहे. ६६ वर्षीय सतीश कौशिक लेकीसाठी जगू इच्छित होते. यासाठी त्यांनी वजन कमी करायला सुरुवात केली होती. तसेच त्यांनी दारू व नॉनव्हेज बंद केलं होतं. ते जिममध्ये जाऊन व्यायामही करत होते, पण अचानक होळीच्या दुसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.