Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सतीश कौशिक यांचा जन्म हरियाणामध्ये झाला होता. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेमध्ये प्रवेश मिळवला. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी त्यांनी रंगभूमी गाजवली. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये काम केले आहे. पुढे १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये त्यांनी नसीरुद्दीन शाह, भक्ती बर्वे, नीना गुप्ता यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या सेटवरच कौशिक व नीना यांच्याच चांगली मैत्री झाली होती.
हेही पाहा>>Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?
नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यामध्ये याचदरम्यान जवळीक वाढली. रिचर्ड्स यांच्यापासून नीना गुप्ता गरोदर राहिल्या. नीना यांनी लग्न न करताच बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर टिकाही झाली होती. आपल्या जवळच्या मैत्रिणीला होणारा त्रास पाहून सतीश यांनी त्यांची मदत करायचे असे ठरवले होते. म्हणून त्यांनी गरोदर असलेल्या नीना गुप्तांना लग्नाची मागणी घातली होती. नीना गुप्तांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात याबाबत खुलासा केला आहे. सतीश कौशिक यांनीही मुलाखतीदरम्यान नीना गुप्तांना मागणी घातल्याचं मान्य केलं होतं. यावर त्यांची पत्नी शशी कौशिक यांची काय प्रतिक्रिया होती, हेही त्यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा>>निधनाच्या एक दिवस आधीच सतीश कौशिक खेळलेले होळी, गावी गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला अन्…
“माझं व नीनाचं नात कसं आहे, हे माझ्या पत्नीला माहीत आहे. नीना नेहमी आमच्या घरी येते. माझी पत्नी शशी माझ्या व नीनाच्या मैत्रिचा आदर करते”, असं कौशिक म्हणाले होते. कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.