ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतीश यांच्या निधनानंतर त्यांची हत्या करण्यात आली, असे आरोप एका महिलेने केल्याने खळबळ उडाली आहे. सतीश कौशिक यांनी निधनापूर्वी दिल्लीतील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळीची पार्टी केली. त्यानंतर सतीश यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या निधनाच्या दोन दिवसानंतर व्यावसायिकाची पत्नी सान्वी मालूने पतीवर अभिनेत्याच्या हत्येचे आरोप केले होते.
सान्वी मालूने पती विकासवर बलात्काराचे आरोप केले आहेत. मी आधी विकास मालूविरोधात तक्रार दिली होती. विकासने लग्नाआधी माझ्यावर बलात्कार केला नंतर बळजबरीने माझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्याचा मुलगाही माझा बलात्कार करू लागला. मला हे सगळं सहन होत नव्हतं, त्यामुळे ऑक्टोबर २०२२ मध्ये मी त्याचं घर सोडलं, असं सान्वी मालूने एएनआयशी बोलताना सांगितलं. यासंदर्भात ‘एशियननेट न्यूज’ने वृत्त दिलंय.
दरम्यान, विकास मालू आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा अल्पवयीन मुलगा दोघांनीही सान्वीविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहेत पॉस्कोअंतर्गत सान्वीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सान्वी व विकास यांच्या एकमेकांवरील तक्रारी पोलिसांनी नोंदवून घेतल्या आहेत. पण अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
सान्वीने सतीश कौशिक यांना आपल्या पतीने मारल्याचा दावा केला होता. “विकासने सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. करोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे १५ कोटी परत करण्याचा त्यांचा कोणताच उद्देश नव्हता. सतीश यांची हत्या करण्यासाठी मी ब्ल्यू पील्स (व्हायग्रा) व रशियन मुलींचा वापर करणार असल्याचंही विकास यांनी मला सांगितलं होतं” असा दावा सान्वीने केला होता.