Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिल्लीतील दीन दयाळ रुग्णालयात नेण्यात आला होता.
सतीश कौशिक यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, कौशिक यांच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. हृदयविकाराचा झटका आल्यानेच कौशिक यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर कौशिक यांच्या मृतदेहावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कौशिक यांच्या कुटुंबियांनी याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा>> निधनापूर्वी सतीश कौशिक यांच्याबरोबर ‘त्या’ फार्महाऊसवर नेमकं काय घडलं? दिल्ली पोलीस करत आहेत तपास
हेही वाचा>>Video: ६६व्या वर्षीही नियमित व्यायाम करायचे सतीश कौशिक, निधनानंतर जीममधील व्हिडीओ व्हायरल
सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी कौशिक यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
हेही पाहा>>Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?
सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे कौशिक ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’ अनेक चित्रपटात झळकले . त्यांनी ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे.