Satish Kaushik Passed Away: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कलाकार मंडळींनी गर्दी केली आहे. थोड्याचवेळामध्ये सतीश यांच्यावर अंतिम संस्कार होतील. सतीश यांचं पार्थिव स्मशान भूमीच्या दिशेने नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलमान खान, अनुपम खेर, जावेद अख्तर, अभिषेक बच्चन यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी सतीश यांच्या घरी उपस्थिती दर्शवली. मात्र यावेळी सतीश यांच्या अगदी जवळचे मित्र अनुपम खचलेले दिसले. गेली ४५ वर्ष अनुपम व सतीश एकमेकांना ओळखत होते. या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती.

आपल्या जवळच्या मित्राचं निधन झालं आहे हे कळताच त्यांना मोठा दुःखद धक्का बसला आहे. सतीश यांचं पार्थिव स्मशान भूमीकडे नेत असताना रुग्णवाहिकेमध्ये अनुपमही बसले होते. यादरम्यानचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम सतीश यांच्या पार्थिवा जवळ बसून ढसाढसा रडताना दिसत आहेत.
८ मार्चला (बुधवारी) संध्याकाळी आठ वाजता सतीश यांनी फोनद्वारे अनुपम यांच्याशी संवाद साधला होता. दिल्लीमधून मुंबईमध्ये परतल्यानंतर हे दोघं भेटणारही होते. मात्र त्यांच्या निधनानंतर अनुपम यांना मोठा धक्का बसला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनुपम आणि सतीश यांच्यामध्ये किती घट्ट मैत्री होती हे दिसून येतं.