चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं आहे. ६६ व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.
सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या.
कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे. ‘एमर्जन्सी’ चित्रपटातील सतिश कौशिक यांच्या फर्स्ट लूकचा फोटो शेअर करत कंगनाने त्यांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती.
हेही वाचा>> सतीश कौशिक यांनी गरोदर असलेल्या नीना गुप्तांना घातली होती लग्नाची मागणी; म्हणाले होते…
सतीश कौशिक यांनी १९८५ साली शशी कौशिक यांच्याशी विवाह केला होता. १९९६ मध्ये कौशिक यांच्या दोन वर्षाच्या मुलाचं निधन झालं. त्यानंतर ५६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने ते पुन्हा वडील झाले. त्यांच्यामागे पत्नी व ११ वर्षांची मुलगी वंशिका असा परिवार आहे.