Satish Kaushik Death : चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कित्येक छोट्या छोट्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचं ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘कॅलेंडर’ हे पात्र चांगलंच लोकप्रिय झालं. या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या सहाय्यकासाठी सतीश कौशिक यांनी आमिर खानचा इंटरव्ह्यु घेतला होता. याबद्दलच आमिर खानने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना आमिर खानने याबद्दल माहिती दिली होती.
शेखर कपूर यांच्याबरोबर काम करायची आमिरची खूप इच्छा होती, तेव्हा ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटावर त्यांच्याबरोबर सतीश कौशिक हेसुद्धा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्यावेळी सतीस कौशिक यांनी आमिरला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून घेण्यास नकार दिला होता. आमिर ही आठवण सांगताना म्हणाला, “मी तेव्हा शेखर कपूर यांना भेटलो आणि त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक सतीश कौशिक होते. त्यांना मी आजवर केलेलं काम आणि इतर गोष्टी दाखवल्या होत्या. मी दिलेली माहिती पाहून ते चांगलेच इम्प्रेस झाले होते पण तेव्हा मला ते काम मिळाले नाही.”
आमिरला नंतर यामागचं खरं कारण समजलं. आमिर म्हणाला, “सतीश यांनी मला नंतर यामागील कारण सांगितलं. सतीश मला म्हणाले की जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा मी स्वतः गाडी चालवत गेलो होतो आणि तेव्हा सतीश कौशिक यांच्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे ज्याच्याकडे स्वतःची गाडी आहे त्या माणसाला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ज्युनिअर पोस्टला घेणं हे सतीश यांना थोडं अवघड गेलं असतं, म्हणून या चित्रपटासाठी त्यांनी मला ते काम दिलं नाही.” सतीश कौशिक यांना ८० च्या दशकात भरपूर लोकप्रियता मिळाली. तसेच त्यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामधून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.