Satya Re Release : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा २६ वर्षांपूर्वी आलेला लोकप्रिय ‘सत्या’ सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमातील डायलॉग आणि गाणी त्यावेळी गाजली होती. या चित्रपटात मनोज बाजपेयी, शेफाली शाह, उर्मिला मातोंडकर, आणि जे. डी. चक्रवर्ती यांसारखे अनेक कलाकार झळकले होते. आता या क्राइम ड्रामाच्या चाहत्यांसाठी राम गोपाल वर्मा यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. हा सिनेमा पुढील वर्षाच्या सुरूवातीला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘सत्या’ पुन्हा थिएटरमध्ये येणार
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) हँडलवर पोस्ट करत सांगितले की ‘सत्या’ १७ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “सत्या पुन्हा थिएटरमध्ये येत आहे, १७ जानेवारी २०२५ रोजी अंडरवर्ल्ड आता अप्परवर्ल्डमध्ये येत आहे!”
राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपट बिझनेस विश्लेषकाने ‘सत्या’ बद्दल केलेले ट्विट देखील शेअर केले. त्या ट्विटमध्ये म्हटले होते, “पुन्हा प्रदर्शित झालेले चित्रपट हे नेहमीच पूर्वीचे ब्लॉकबस्टर नसतात. ते असे चित्रपट असतात ज्यांनी सिनेमा तयार करण्याच्या परिभाषेला आव्हान दिले आणि त्यात बदल घडवले. ‘सत्या’ हा असाच एक चित्रपट आहे! १७ जानेवारी २०२५ ला थिएटरमध्ये तो पुन्हा पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे!” यावर राम गोपाल वर्मा यांनी “आमेन!” हे उत्तर दिले
‘सत्या’बद्दल
राम गोपाल वर्मा यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या ‘सत्या’ या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेते सौरभ शुक्ला यांनी लिहिली आहे. यात मकरंद देशपांडे, सौरभ शुक्ला, आदित्य श्रीवास्तव, गोविंद नामदेव, दिवंगत नीरज वोरा, संजय मिश्रा, मनोज पाहवा, यांच्यासारखे प्रतिभावान कलाकारही झळकले होते.
‘सत्या’ची कथा जेडी चक्रवर्ती यांनी साकारलेल्या सत्या या पात्राभोवती फिरते. यात त्यांच्या पात्राची भेट गँगस्टर भीकू म्हात्रे (मनोज बाजपेयी) याच्याशी होते. मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटातील मनोज बाजपेयी यांचा ‘मुंबई का किंग कौन?…’ हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला होता. विशाल भारद्वाज यांनी सगीतकार म्हणून ‘सत्या’मधून पदार्पण केले. या सिनेमातील गुलजार यांनी लिहिलेले ‘सपनों में मिलती है’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
हेही वाचा…“तुझं लग्न झालंय, दोन मुलं आहेत…”; बोनी कपूर यांनी प्रपोज केल्यावर ६ महिने श्रीदेवी…
दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी यावर्षी तेलुगू राजकीय थ्रिलर ‘व्यूहम’चे दिग्दर्शन केले होते. मनोज बाजपेयी अलीकडेच ‘द डिस्पॅच’ या ‘झी ५’ वरील थ्रिलर चित्रपटात दिसले होते. ते पुढील वर्षी राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या स्पाय थ्रिलर सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये प्राइम व्हिडिओवर दिसणार आहे.