बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच निर्मात्यांनी ‘टायगर ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचा अॅक्शन लूक पाहायला मिळत आहे. याबरोबरच इम्रान हाश्मीचीही यामध्ये झलक पाहायला मिळत आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इम्रान हाश्मीला फारसा स्क्रीन टाइम न मिळाल्याने त्याचे चाहते चांगलेच नाराज आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी याबद्दल भाष्य करायला सुरुवात केली आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याने इम्रानचे चित्रपटातील सीन्स कापले गेले असल्याचा दावा केला आहे.
आणखी वाचा : “मी दोन्ही चित्रपट…” ‘सालार’मध्ये झळकणाऱ्या पृथ्वीराज सुकुमारनचं किंग खानच्या ‘डंकी’विषयी मोठं विधान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके याने ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये केआरके लिहितो, “आपले बरेच सीन्स कट केल्याचा अन् फसवणुकीचा आरोप इम्रानने यश राज फिल्म्सवर लावला आहे. गेले वर्षभर इम्रान या चित्रपटाची वाट बघत होता, या चित्रपटामुळे आपल्या लोकप्रियतेमध्ये अधिक वाढ होईल असा त्याचा समज होता, पण आता ‘टायगर ३’मध्ये इम्रानचे काहीच सीन्स शिल्लक असल्याचं समोर येत आहे.”
अद्याप इम्रानकडून याबाबतीत कोणतंही स्पष्टीकरण किंवा अधिकृत वक्तव्य आलेलं नाही, शिवाय यश राज फिल्म्सकडूनही याची पुष्टी झालेली नाही. ‘टायगर ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पाचवा चित्रपट आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खानबरोबर कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मीने नकारात्मक भूमिका साकारली आहे. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.