सेलिब्रिटी जोडपं मोहम्मद झीशान अय्युब आणि मराठमोळी रसिका आगाशे दोघेही ‘स्कूप’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. झीशानने या सीरिजमध्ये ‘इमरान’ ही भूमिका साकारली होती, तर रसिकानेही यामध्ये जेलमधील महिला पोलिसाची भूमिका साकारली होती. या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल भाष्य केलं. या दोघांनी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या दिवसातील अनेक किस्से सांगितले.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून उत्तीर्ण झाल्यावर या दोघांनी अवघे २४ वर्षांचे असताना लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता १६ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर ते दिल्लीहून मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ४० हजार रुपये होते. ‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, “आम्ही अशी वेळ पाहिली आहे, ज्यावेळी आमच्याजवळ एक रुपयाही नव्हता. आमचे २४ व्या वर्षी लग्न झाले, त्यामुळे आम्ही खूप भोळे होतो. आम्हाला वाटलं मुंबईत जगायला ४० हजार रुपये पुरेसे आहेत. पण ते दुसऱ्याच दिवशी घराचं डिपॉझिट भरण्यात संपले. पण आम्ही दुःखी नव्हतो. आमचं एका खोलीचं घर होतं, पण आमचे मित्र रोज संध्याकाळी आमच्याकडे चहा प्यायला यायचे. आता घर मोठं आहे, पण संध्याकाळ अजूनही चहा आणि मित्रांसाठी आहे.”
“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”
घरासाठी फक्त एका महिन्याचं डिपॉझिट द्यावं लागतं, पण ब्रोकरने आमच्याकडून तीन महिन्यांचं घेतलं होतं, असं झीशानने सांगितलं. त्या कठीण काळात अभिनेता विनीत कुमारने मदत केली आणि त्याला काम मिळालं, त्या कामाचे १५ हजार रुपये मिळाले होते. “आम्ही घरात बसून विचार करत हसत होतो की आपण किती मूर्ख आहोत ना, एवढ्या पैशात मुंबईत सगळं होईल म्हणून निघून आलो. तेव्हा विनीतने मदत केली. कोणीतरी अॅक्टिंग स्कूल सुरू करत होतं आणि त्यासाठी तीन महिन्याचा सिलॅबस मला लिहून देण्यास सांगितलं. मी एका रात्रीत तो लिहून दिला. पण त्याची झेरॉक्स काढायला आणि घरात दोन रुपये शोधत होतो. त्यानंतर मी तो सिलॅबस सबमिट केला आणि त्या माणसाने मला १५ हजार रुपये दिले होते,” असं झीशान म्हणाला.
रसिका व झीशान दोघेही २५ रुपयात चायनीज खाऊन पोट भरायचे. असाच संघर्ष सुरू असताना झीशानला ‘नो वन किल्ड जेसिका’ व ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ हे चित्रपट मिळाले. पण नवीन असल्याने तेव्हा कामाचा मोबदला जास्त मिळत नव्हता. “मी चित्रपट करत होतो, पण पैसे कमी मिळायचे. त्यामुळे तीन वर्षे रसिका डबल शिफ्टमध्ये काम करायची. दादरमध्ये नाटक करून ट्रेनने दहिसरला मालिकेचं शूटिंग करायला जायची. सुरुवातीची तीन वर्षे तिनेच पैसे कमवून घर चालवलं होतं,” असं झीशानने सांगितलं.
आनंद एल राय दिग्दर्शित ‘रांझणा’ चित्रपट आल्यानंत झीशानच्या करिअरला गती मिळाली. नंतर त्याने ‘तनु वेड्स मनू: रिटर्न्स’, ‘रईस’ आणि ‘तांडव’ यांसारख्या चित्रपट आणि शोमध्ये काम केले.