Salman Khan & Aishwarya Rai : ९० च्या दशकात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होती. चित्रपटातील त्यांचा ऑनस्क्रीन रोमान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता पण, त्यापेक्षाही ऐश्वर्या-सलमानच्या रिअल लाइफ डेटिंगच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. हे नातं लग्नापर्यंत टिकू शकलं नाही पण, आजही सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल त्यांचे चाहते चर्चा करतात.
नुकत्याच ‘मेरी सहेली’च्या पॉडकास्टमध्ये ज्येष्ठ सिनेपत्रकार व लेखक हनीफ झवेरी यांनी सलमान-ऐश्वर्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच या दोघांचं ब्रेकअप होण्यामागचं कारण झवेरी यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.
झवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रचंड प्रेमात होते. मात्र, अभिनेत्रीचे आई-वडील भाईजानच्या एक्स रिलेशनशिप्समुळे काहीसे नाराज होते. त्याकाळी सलमानचं नाव सोमी अली आणि संगीत बिजलानी यांच्याबरोबर जोडलं गेलं होतं. त्यामुळे सलमान खान हा ऐश्वर्याच्या प्रेमात नसून दोघांचं हे रिलेशनशिप नाममात्र आहे असं ऐश्वर्याच्या पालकांना वाटत होतं. यामुळे या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. अशी माहिती झवेरी यांनी दिली. ते सांगतात, “ऐश्वर्याच्या पालकांना सलमान त्यांच्या लेकीबरोबर फक्त फ्लर्ट करतोय असं वाटत होतं.”
दुसरीकडे, सलमानला ऐश्वर्याशी लग्न करून आपलं आयुष्य सेट करायचं होतं पण, अभिनेत्रीला त्यावेळी स्वत:च्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. यामुळे दोघांमधले वाद वाढले होते. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यातील प्राधान्यक्रम त्याकाळी वेगळा होता. मात्र, या सगळ्या वादादरम्यान सलमानने एका रात्री असं काही केलं की, या दोघांचं नातं संपुष्टात आलं.
सलमान एके दिवशी रात्री ऐश्वर्याच्या घरी पोहोचला होता. तिच्या घरी अवेळी जाऊन त्याने वाद घातला आणि यामुळेच अभिनेत्रीने रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेतला. याच भांडणात सलमानमुळे ऐश्वर्याला दुखापत झाल्याचं वृत्त सर्वत्र आलं होतं.
“सलमानला लवकरात लवकर ऐश्वर्याशी लग्न करायचं होतं पण, ऐश्वर्याला तेव्हा स्वत:चं करिअर घडवायचं होतं. यादरम्यान, दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. सलमान एके दिवशी रात्री ऐश्वर्याच्या घरी गेला आणि त्याने जोरजोरात तिच्या घराचा दरवाजा वाजवला. त्याठिकाणी मोठा तमाशा झाला होता. यामुळे ऐश्वर्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सुद्धा सलमान विरोधात मुलाखती दिल्या होत्या. या सगळ्या गोष्टी वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. या गोष्टी ऐश्वर्याच्या मनाला लागल्या, हे आपल्या भवितव्यासाठी ठिक नाही हा विचार करून तिने या रिलेशनशिपमधून काढता पाय घेतला. तिने हे नातं त्या रात्री संपवलं” असं झवेरी यांनी सांगितलं.