२० वर्षांपूर्वी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘खाकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’च्याबरोबरीने प्रदर्शित होऊनसुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली होती. आता या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा होत आहे. त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या सीक्वलची जबरदस्त चर्चा ऐकायला मिळत आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, तुषार कपूर, ऐश्वर्या राय, अजय देवगण, अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिवंगत निर्माते केशू रामसे यांचे सुपुत्र अभिनेता व निर्माता आर्यमन रामसे यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत या बातमीची पुष्टी केली. तब्बल २० वर्षांनंतर ‘खाकी’चा सीक्वल बनणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : ‘ठाकरे’नंतर ‘या’ बायोपिकमध्ये झळकणार नवाजुद्दीन सिद्दिकी; साकारणार ‘या’ अधिकाऱ्याची भूमिका
मीडियाशी संवाद साधताना आर्यमन रामसे म्हणाले, “हो आम्ही ‘खाकी’च्या सीक्वलच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत. आमच्याकडे एक मूळ कथा तयार आहे. पुढच्या वर्षापर्यंत या चित्रपटावर काम सुरू होईल अशी आशा आहे.” याहून अधिक माहिती त्यांनी दिलेली नसली तरी ही एक नवीन कथा आहे जी आजच्या काळाशी सुसंगत असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मूळ चित्रपटातील अक्षय कुमार, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांनी साकारलेली पात्रं मृत्युमुखी पडलेली असल्याने या नव्या भागाच्या कास्टिंगबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. जसं कथेचं काम पूर्ण होईल तसं या चित्रपटात नेमकं कोणाला घेता येईल यावर विचार करता येईल असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. अमिताभ बच्चन आणि तुषार कपूर यांच्याशी याबद्दल चर्चा करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबरोबरच या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषीच करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.