बॉलिवूडमध्ये एखाद्या गोष्टीची लाट येणं हा प्रकार नवीन नाही. चरित्रपट यशस्वी ठरला की एकापाठोपाठ एक चरित्रपटांची रांग लागते, विनोदी भयपटांच्या बाबतीतही हा प्रकार आपण याचवर्षी जूनपासून अनुभवला आहे. सिक्वेलपट हे तर बॉलिवूडसाठी आर्थिक यश मिळवून देणारे हुकूमी समीकरण आहे. त्यामुळे त्याचा वेळोवेळी फायदा करून घेतला जातो. मात्र हे करत असताना ओळीने फक्त सिक्वेलपटच प्रेक्षकांच्या माथी मारण्याचा प्रकार आनंददायी म्हणता येणार नाही. आणि तरीही येत्या नोव्हेंबर महिन्यात चार मोठे सिक्वेलपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दोन मोठे सिक्वेलपट तर दिवाळीच्या मुहूर्तावर एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
हिंदीतही सिक्वेलपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो हे आजवर निर्मात्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे एखादा चित्रपट यशस्वी ठरला की त्याचा पुढचा चित्रपट कधी येणार? याची तयारी केली जाते. मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांनाही सिक्वेलपटांच्या यशस्वी समीकरणाची लागण झालेली आहे. यंदा सर्वाधिक यशस्वी ठरलेला चित्रपटही सिक्वेलपटच आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री २’ हा अमर कौशिक दिग्दर्शित सिक्वेलपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा ६०० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला असून सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट हा विक्रमही या चित्रपटाच्या नावावर जमा होणार आहे. त्यामुळे याही यशस्वी चित्रपटाच्या सिक्वेलचे गणित पुढची काही वर्षं सुरू राहील. याआधी बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरलेल्या काही मोठ्या चित्रपटांचे सिक्वेल नोव्हेंबरमध्ये अनुभवायला मिळणार आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ हा ‘सिंघम’ चित्रपटाचा तिसरा सिक्वेल ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याचा दुसरा भाग २०१४ मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ नावाने प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा >>> …म्हणून यश चोप्रा यांनी राजेश खन्नांसह काम करणं केलेलं कमी, ‘सिलसिला’ सिनेमाच्या लेखकाने केला होता खुलासा
या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जून कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार अशा नामी कलाकारांची फौज आहे. याच चित्रपटाबरोबर आणखी एका यशस्वी चित्रपटाचा तिसरा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. अनीस बाज्मी दिग्दर्शित ‘भुलभुलैय्या ३’ हा चित्रपटही याच दिवशई प्रदर्शित होणार असून याही चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन असे नामी कलाकार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात २२ नोव्हेंबरला ‘धडक २’ हा धर्मा प्रॉडक्शनचा सिक्वेलपट प्रदर्शित होणार असून यात सिध्दांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर या महिन्याच्या अखेरीस म्हणजे २९ नोव्हेंबरला ‘मेट्रो इन दिनो’ हा बहुचर्चित सिक्वेलपट प्रदर्शित होणार आहे. अनुराग बसू दिग्दर्शित ‘लाईफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट २००७ साली आला होता. त्याचा सिक्वेलपट १७ वर्षांनी प्रदर्शित होणार असून यात सारा अली खान, कोंकणा सेन, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, अली फजल, फातिमा सना शेख अशी भन्नाट कलाकार मंडळी एकत्र दिसणार आहेत. सिक्वेलपटांचा हा सिलसिला नोव्हेंबरपुरताच मर्यादित नाही. डिसेंबरमध्ये ‘पुष्पा द रूल २’ आणि ‘वेलकम टु द जंगल’ हे दोन सिक्वेलपट अनुक्रमे पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. त्याशिवाय, हॉलिवूडचा ‘मुफासा : द लायन किंग’ हा सिक्वेलपट आणि हिंदीतही ‘सितारे जमीन पर’ हा सिक्वेलपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. दोन महिन्यात किमान मराठीत तरी नवीन चित्रपटच पाहायला मिळणार आहेत हेच काय ते समाधान.