११ ऑक्टोबर रोजी महानायक अमिताभ बच्चन ८० वर्षांचे होणार आहेत. गेल्या चार दशकांपासून ते मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बॉलिवूडसाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. या वयातही ते चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. शुक्रवारी त्यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०२२ मध्ये आत्तापर्यंत त्यांचे ‘झुंड’, ‘रनवे ३४’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुडबाय’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या वर्षातला त्यांचा पाचवा चित्रपट ‘ऊंचाई’ नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री शबाना आझमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील गाणं चित्रपटगृहातील पडद्यावर सुरु असल्याचे दिसून येते. चित्रपट पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक या गाण्यावर नाचत, गात आहेत. टाळ्या-शिट्या वाजवत या सुपरहिट चित्रपटाचा आनंद घेत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कित्येक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आजही मिळणारा प्रतिसाद शबाना यांच्या व्हिडीओमार्फत पाहायला मिळाला.
आणखी वाचा – “मला पॉपकॉर्न खाणारे प्रेक्षक… ” शाहरुख खानने व्यक्त केली होती खंत
या व्हिडीओला त्यांनी “काल पीव्हीआर जुहू येथे प्रेक्षकांसह ‘डॉन’ पाहिला. चित्रपटातील प्रत्येक संवाद, त्यातील गाण्याची ओळ लोक तोंडपाठ असल्यासारखे म्हणत होतो. मला एखाद्या रॉक कॉन्सर्टमध्ये आल्याचा भास झाला. सलीम जावेद, अमिताभ बच्चन तुम्ही ग्रेट आहात. फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि पीव्हीआर सिनेमा यांचे आभार” असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आणखी वाचा – लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच अभिनेत्री नयनतारा झाली आई, घरी जुळ्या मुलांचे आगमन
अमिताभ यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि पीव्हीआर सिनेमा यांनी मिळून ‘बच्चन बॅक टू बिगिनिंग’ (Bachchan back to beginning) या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत ११ ऑक्टोबरपर्यंत भारतातल्या १७ शहरांमध्ये अमिताभ यांचे ११ सुपरहिट चित्रपट दाखवले जाणार आहेत. दरम्यान जुहूच्या पीव्हीआर सिनेमागृहामध्ये शनिवारी त्यांचा ‘डॉन’ हा चित्रपट दाखवला गेला. या स्क्रीनिंगला अभिनेत्री शबाना आझमी यांनी हजेरी लावली होती.