बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपे म्हणून जावेद अख्तर व शबाना आझमी यांची ओळख आहे. या वर्षी त्यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली. सिनेमाकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टिकोन वेगळा असला तरी एकमेकांप्रति आदर व समजूतदारपणा हे त्यांच्या नात्यातील महत्त्वाचे घटक आहेत. ‘शोले’, ‘दीवार’ यांसारख्या चित्रपटांसाठी जावेद अख्तर यांना ओळखले जाते; तर ‘अंकुर’, ‘अर्थ’, ‘मासूम’ अशा अनेक चित्रपटांतील लक्षवेधी भूमिकांसाठी शबाना आझमींचे नाव घेतले जाते.
काय म्हणाल्या शबाना आझमी?
हॉलिवूड रिपोर्टरने आयोजित केलेल्या ‘ॲक्टर्स राऊंडटेबल’मध्ये बोलताना शबाना आझमींनी जावेद अख्तर यांच्याबद्दल म्हटले, “आम्ही वेगवेगळ्या माध्यमांतून काम करीत असलो तरी एखाद्या कठीण प्रोजेक्टसाठी आम्ही कायमच एकमेकांना प्रोत्साहन देत असतो. आम्ही विचारांची देवाणघेवाण करीत असतो; पण आमच्या विचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ- घर बांधताना मला जावेदची कल्पना आवडली नव्हती. मला आठवड्याच्या शेवटी आराम करण्यासाठी कॉटेज पाहिजे असताना ते इतके मोठे घर का बांधत आहेत, असा मला प्रश्न पडायचा. पण माझ्या एका मित्राने मला सांगितले की, जावेद नेहमी ‘शोले’चा विचार करेल आणि मी नेहमी ‘अंकुर’चा विचार करीन. मी त्यांच्यावर अनेकदा टीकादेखील करते आणि त्यामुळे जेव्हा मी त्यांचे कौतुक करते, त्यावेळी त्यांना मनापासून आनंद होतो.”
जावेद अख्तर यांच्या पाठिंब्याचा त्यांच्या चित्रपटांतील भूमिका निवडण्यात मोठी मदत होत असल्याचे सांगत शबाना आझमींनी म्हटले, “जेव्हा मला ‘फायर’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती तेव्हा मी द्विधा मन:स्थितीत होते. कारण- त्यावेळी समलैंगिक व्यक्तींमधील प्रेम याबद्दल कोठेही बोलले जात नव्हते. जावेद यांनी मला विचारले की, तुला ती स्क्रिप्ट आवडली आहे का? मी हो म्हटले. त्यावर त्यांनी, मग चित्रपट कर, असे सांगितले. त्यामुळे माझ्यात धाडस निर्माण झाले”, असे म्हणत जावेद अख्तर यांनी अनेकदा प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे एका मजेशीर किश्शाबाबत त्यांनी, “जावेद मला फक्त चांगल्या गोष्टी सांगतात, माझ्याशी फक्त छान बोलतात, कौतुक करतात असा तुम्ही विचार करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी ‘मकडी’ हा चित्रपट करीत होते. त्यामध्ये मी चेटकिणीची भूमिका साकारली आहे. मी त्या भूमिकेसाठी सर्व प्रकारचा मेकअप करून पाहत होते. त्यांनी मला विचारले की, तू काय करत आहेस? मी सांगितले की, मी चेटकिणीची भूमिका साकारत आहे. हे ऐकल्यावर ते मला म्हणाले की, मग तुझा हा सगळा मेकअप काढ”, असे हसत सांगितले. “आम्ही एकमेकांच्या दंतकथेवर विश्वास ठेवत नाही”, असेही शबाना आझमींनी स्पष्ट केले.
दरम्यान, शबाना आझमींच्या चित्रपटाबद्दल बोलायचे, तर त्या लवकरच ‘बन टिक्की’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.