महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’ या चित्रपटाला मोठे यश मिळाले होते. हा सिनेमा त्यांच्या परवीन बाबी यांच्याबरोबर असलेल्या नात्यापासून प्रेरित होता. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधावर आधारित होता. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शबाना आझमी(Shabana Azmi), स्मिता पाटील, कुलभूषण खरबंदा व राज किरण हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत होते. पण सुरुवातीला या चित्रपटाची स्क्रिप्ट अशी काही नव्हती, असे शबाना आझमी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

“मृत्यू जवळ अनुभवण्यासारखं…”

शनिवारी पार पडलेल्या ‘मामि मुंबई फिल्म फेस्टिवल’ (MAMI Mumbai Film Festival) मध्ये शबाना आझमी यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, “‘अर्थ’ चित्रपटावेळी दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या, ते अनेक संकटांचा सामना करीत होते. आमच्याकडे स्क्रिप्ट नव्हती. आम्हाला चित्रपटाच्या कथानकाची कल्पना होती. महेश भट्ट यांच्याकडे असे काहीतरी होते; ज्यामुळे अवघड सीनदेखील आम्ही सहज करू शकत होतो. तो एक वेगळाच अनुभव होता. उदाहरणार्थ- ते मला एखादा अवघड सीन करायला सांगायचे आणि मी तो बरोबरच केला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असायची. मी त्यांना म्हणत असे की, मी हे करू शकत नाही. त्यावर ते म्हणायचे, “कृत्रिम संघर्ष चालणार नाही. आपल्याकडे वेळ नाही. त्यापेक्षा तो सीन कर.”

याआधी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी म्हटले होते, “अर्थ हा चित्रपट माझ्या वैयक्तिक आयुष्यावर, माझ्या जखमांवर बनला आहे. त्याचे इंधन म्हणून वापर करण्याचे धाडस माझ्यात होते. माझ्या विशीमध्ये मी माझ्या पहिली पत्नी किरणबरोबर परीकथेतल्यासारखा रोमान्स केला होता. वेड्यासारखे मी तिच्यावर प्रेम करीत असे. लवकरच आम्ही लग्न केले. वयाच्या २१ व्या वर्षी मी वडील झालो. काळाच्या ओघात मी भारतातील सर्वांत यशस्वी अभिनेत्री परवीन बाबीच्या प्रेमात पडलो. या नात्याचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.”

पुढे त्यांनी म्हटले होते, “परवीनबरोबरचं नातं आणि माझं जिच्यावर नितांत प्रेम होतं, अशी माझी पहिली बायको किरणला मी सोडलं याचा माझ्यावर भावनिकरीत्या खूप परिणाम झाला. ते सगळं मृत्यू जवळ अनुभवण्यासारखं होतं. त्यामुळे मी विचार केला की, माझ्या पद्धतीनं चित्रपट बनवायचा. ‘अर्थ’ चित्रपटाच्या वेळी मार्केटला काय पाहिजे, यानुसार चित्रपट बनविण्यापेक्षा मला काय पाहिजे, त्यानुसार चित्रपट बनवणार, असं मी ठरवलं होतं. आपण ऐकत असलेल्या संवादामागची शांतता, शब्दामागचे खोल अर्थ सांगणारा चित्रपट मला बनवायचा होता. अशा प्रकारे अर्थ हा चित्रपट तयार झाला”, अशी आठवण महेश भट्ट यांनी सांगितली होती.

हेही वाचा: “बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा करतात हे त्याला…”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा दावा; म्हणाली, “तो खूप दयाळू…”

दरम्यान, आतापर्यंत विवाह्यबाह्य संबंधावर आधारित सर्वांत उत्तम चित्रपट म्हणून ‘अर्थ’ या चित्रपटाकडे आजही पाहिले जाते.