‘अंकुर’ या १९७४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी(Shabana Azmi) होय. ‘स्वामी’, ‘आधा दीन आधी रात’, ‘कर्म’, ‘हीरा और पत्थर’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘खून की पुकार’, ‘थोडीसी बेवफाई’, अशा अनेक चित्रपटांतून शबाना आझमींनी काम केले आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे. याबरोबरच अभिनेत्री आजही चित्रपटांत विविध भूमिका साकारताना दिसतात. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक होताना दिसले होते. आता त्यांच्या एका वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या शबाना आझमी?

अभिनेत्री शबाना आझमी यांनी नुकतीच ‘ह्युमन्स ऑफ सिनेमा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, प्रतिभा असेल तर तुम्ही कच्च्या हिऱ्यासारखे आहात. तुम्हाला योग्य प्रशिक्षण मिळाले तर ती प्रतिभा दिसेल. मी प्रशिक्षणावर खूप विश्वास ठेवते, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.”

याबद्दल अधिक बोलताना शबाना आझमींनी म्हटले, “काही कलाकार असे आहेत, ज्यांनी कोणतेही प्रशिक्षण न घेता स्वत:च्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली. पण, याचे श्रेय त्यांच्या अथक परिश्रम व सरावाला जाते. जर तुम्ही वाईट कलाकार असाल, तर तुम्ही जगू शकत नाही. कारण अशा कलाकारांमध्ये एक रिक्तपणा असतो, तो कधीही भरून निघत नाही.”

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “ज्यांचे चेहरे चांगले असतात, म्हणजेच जे चांगले दिसतात त्यांना अभिनय येतच असेल असे नाही. चित्रपट निर्मात्यांना वाटते, त्यांनी चांगले दिसणाऱ्यांना चित्रपटात घेतले म्हणजे ते त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात. पण, तुम्हाला फक्त त्यांचे चेहरे वापरायचे असतील तर तुम्ही हे करू शकता. मात्र, जेव्हा संवाद म्हणायचे असतात, त्यावेळी त्याचा उपयोग होत नाही.”

दिग्दर्शक गौतम घोष यांच्या ‘पतंग’ (१९९३) मधील अनुभव सांगताना शबाना आझमी म्हणाल्या, “या चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप नवख्या कलाकारांबरोबर काम करावे लागले. ते त्यांचे काम चांगले करत होते. मात्र, एका आठवड्यानंतर जेव्हा ओम पुरी आले, त्यावेळी एक व्यावसायिक कलाकार आला म्हणून खूप दिलासा मिळाला होता. ओम पुरीबरोबर काम करताना खूप आनंद झाला.” याबरोबरच नसीरुद्दीन शाह हे सर्वात आवडते सह-कलाकार असल्याचे त्यांनी म्हटले. फारुख शेख आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरदेखील त्यांना काम करणे पसंत असल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा: स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

दरम्यान, शबाना आझमी लवकरच ‘बन टिक्की’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये झीनत अमान व अभय देओल हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi says looks dont equal talent recalls relief when om puri joined patang films set nsp