लेखक आणि गीतकार म्हणून मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केलेल्या अनेक नावांमध्ये जावेद अख्तर यांचे नाव अग्रस्थानी येते. लेखनाशिवाय ते आपल्या परखड वक्तव्यांमुळे मोठ्या चर्चेत असतात. आता मात्र त्यांची पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी अरबाज खानच्या ‘द इनव्हिन्सिबल्स’ या कार्यक्रमात जावेद अख्तर यांच्या दारुच्या व्यसनाबद्दल वक्तव्य केले आहे.
शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांच्या दारुच्या व्यसनाबद्दल बोलताना म्हटले आहे की, जेव्हा जावेद दारुच्या व्यसनात पूर्ण बुडाला होता तो काळ कठीण होता. तो दररोज रात्री दारुची एक पूर्ण बाटली संपवायचा. पण तो त्याच पद्धतीने दारु पित राहिला तर तो फार काळ जगू शकणार नाही, ही गोष्ट जेव्हा त्याच्या लक्षात आली तेव्हा त्याने दारु सोडण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना त्या म्हणतात,” त्यावेळी आम्ही लंडनमध्ये होतो. जावेदने इतकी दारु प्यायली होती की सगळा दुर्गंध येत होता. मला मनोमन वाटत होते की ही सुट्टीदेखील त्या अनेक वाया गेलेल्या सुट्ट्यांसारखी असणार त्यावेळी त्याने मला शांतपणे सांगितले, माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये आणि नाश्ता केल्यानंतर त्याने मला सांगितले की, यापुढे मी कधीही दारु पिणार नाही.
शबाना आझमी म्हणतात, ” मी त्यावर त्याला एकही प्रश्न विचारला नाही. फक्त एवढेच विचारले, म्हणजे?तो म्हणाला, “यापुढे मी कधीही दारु पिणार नाही.” असं त्याने याआधी कधीही म्हटले नव्हते आणि ज्यादिवशी त्याने हे म्हटले त्यादिवसापासून त्याने कधीही दारुला हात लावला नाही. जावेद अख्तर यांची इच्छाशक्ती अविश्वसनीय असल्याचे त्या म्हणतात. जशी त्याच्याकडे इच्छाशक्ती आहे, त्याप्रकारची इच्छाशक्ती असणे माझ्यासाठी अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२०१२ साली जावेद अख्तर यांनी आपल्या दारुच्या व्यसनाविषयी सगळ्यात पहिल्यांदा सत्यमेव जयतेच्या व्यासपीठावर उघडपणे सांगितले होते. त्यांनी म्हटले होते- ” मी वयाच्या १९ व्या वर्षी खूप तरुणपणी दारु प्यायला सुरुवात केली. जेव्हा पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मुंबईत आलो तेव्हा मित्रांबरोबर दारु प्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ती सवय झाली. सुरुवातीला माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते, पण जसे यश मिळत गेले तसे पैसेही येत गेले. एक काळ असाही होता जेव्हा मी एक बॉटल एका दिवसात संपवत होतो.” असा खुलासा जावेद अख्तर यांनी केला होता.